Flight Viral Video : विमानतळावरील अनेक घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे फार मजेशीर तर काही फारच विचित्र, धक्कादायक असतात. सध्या गोवा विमानतळावरील एक विचित्र घटना समोर आली आहे, ज्यात प्रवासी तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत. गोव्याहून लखनौला जाणाऱ्या विमानाची प्रवासी वाट पाहत बसले होते, यावेळी प्रवाशांना अचानक फ्लाइट रद्द झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे प्रवाशांचा राग अनावर झाला. यावेळी विमानतळावर उड्डाण रद्द केल्याने प्रवासी आणि ग्राउंड स्टाफमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
विमानतळावर यावेळी मोठ्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यादरम्यान ग्राउंड स्टाफ प्रवाशांना सांगताना ऐकू येतेय की, फ्लाइट केबिनमध्ये उंदीर आढळल्याने फ्लाइट रद्द करण्यात आली आहे.
उंदरामुळे विमान उड्डाण रद्द, प्रवाशांचा गोंधळ
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येतेय की, अचानक विमान रद्द झाल्याने प्रवासी खूप संतापले. ग्राउंड स्टाफने प्रवाशांना सांगितले की, फ्लाइटच्या केबिनमध्ये उंदीर दिसला, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव फ्लाइट रद्द करावी लागली. या विचित्र कारणामुळे प्रवासी संतापले आणि प्रवासी ग्राउंड स्टाफवर जोरजोरात ओरडू लागले. यावेळी प्रवाशांनी विमान रद्द झाल्याची माहिती का दिली नाही? असा सवाल केला. एका प्रवाशाने सवाल केला की, उंदीर पकडायचाच होता तर तासनतास वाट पाहायला का लावली? तर काही जण, एवढी महागडी तिकिटे घेऊन आम्हाला हे सर्व सहन करावे लागत असल्याचे म्हणत आहेत.
“उंदराला एअरपोर्टवर मोफत ट्रिप मिळाली.” युजरची कमेंट
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी मजेशीर कमेंट्स पोस्ट करण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिले की, “उंदराला एअरपोर्टवर मोफत ट्रिप मिळाली.” तर दुसऱ्याने लिहिले, “विमानतळ कर्मचाऱ्यांनी उंदरासाठी बिझनेस क्लासची सीट बुक करायला हवी होती.” काही लोकांनी एअरलाइन्सला सुरक्षा उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला.
या घटनेवर निवेदन देताना विमान कंपनीने प्रवाशांच्या सुरक्षिततेला आपले प्राधान्य असल्याचे सांगितले. केबिनमध्ये उंदीर असल्याने यंत्रणा बिघडली, त्यामुळे उड्डाण रद्द करणे बंधनकारक होते. या घटनेमुळे विमान कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.