येत्या 1 जानेवारीपासून केबल सेवा महागणार आहे. केबल सेवा घेणाऱ्यांना आता महिन्याला 130 रुपये भाडे द्यावं लागणार आहे. यामध्ये फक्त 100 चॅनल मोफत मिळणार आहेत. मात्र इतर चॅनलसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. यासाठी 50 पैशांपासून ते 19 रुपयांपर्यंत भाडं आकारण्यात येणार आहे. याशिवाय सेवाकरही भरावा लागणार आहे. यामुळे केबल पाहण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसै मोजावे लागणार आहेत.
सध्या केबल ऑपरेटरकडून प्रत्येक महिन्याला 250 ते 450 रुपये भाडं आकारलं जातं. यामध्ये 450 हून जास्त चॅनल दाखवले जातात. पण आता ग्राहकांना 130 रुपयांत फक्त 100 चॅनल मोफत पहायला मिळणार आहेत. याशिवाय आपल्या पसंतीचे चॅनल हवे असल्यास ग्राहकांना पॅकेज घ्यावे लागणार आहे. या पॅकेजमध्ये प्रत्येक चॅनेलचा दर वेगळा असणार आहे. याशिवाय त्यावर सेवाकर आकारला जाईल. चॅनेलचा दर कमीत कमी 50 पैसे तर जास्तीत जास्त 19 रुपये असणार आहे.
याचा अर्थ जर तुम्ही 19 रुपये दर असणारे 10 चॅनल घेतले तर तुम्हाला 130 अधिक 190 रुपये म्हणजेच 220 रुपये भरावे लागतील. 29 डिसेंबरनंतर हे नवे दर लागू होणार आहेत.
उदाहरणार्थ – तुम्हाला झी मराठी चॅनेल पहायचा असल्यास बेस पॅक 130 रुपये आणि झी मराठीचे 19 रुपये असे एकूण 149 रुपये द्यावे लागतील. किंवा तुम्हाला कलर्स मराठी, सोनी मराठी आणि झी मराठी चॅनल हवा असल्यास बेस पॅकचे 130 रुपये आणि अनुक्रमे चॅनलचे 17, 10 आणि 19 रुपये याचा अर्थ 146 रुपये भरावे लागतील.
तुम्ही ज्याप्रमाणे चॅनलची संख्या वाढवा त्याप्रमाणे दर वाढत जाईल. आवडते चॅनल्स लक्षात घेतल्यास ग्राहकांना किमान 500 रुपये भरावे लागतील.
सर्व केबल, डिश, आयपी टीव्ही, आणि हिट्स कंपन्यांसाठी एकच दर निश्चित करण्यात आला आहे. एखाद्या केबल ऑपरेटर किंवा डिश कंपनी ने एमआरपीपेक्षा जास्त पैसे घेतले तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय कोणत्याही एसडी किंवा एचडी चॅनलची किंमत 19 रुपयांपेक्षा जास्त ठेवता येणार नाही असा नियम करण्यात आला आहे. याआधी स्टार स्पोर्ट्स हिंदी चॅनल हवा असल्यास 40 रुपये द्यावे लागायचे त्याजागी 19 रुपयेच द्यावे लागतील.