काहींना थरारक गोष्टी करायला खूपच आवडतात मग त्याच्यासाठी जीव धोक्यात घालायची वेळ आली तरी चालेल. अशाच थरारक गोष्टी करण्याची आवड असणा-यांसाठी ऑस्ट्रेलियातील एक ठिकाण खूपच प्रसिद्ध आहे. ‘मृत्यूचा पिंजरा’ म्हणजेच ‘देथ ऑफ केज’ म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. ऑस्ट्रेलियातल्या डार्विन येथील वाइल्ड लाइफ पार्कमध्ये हा थरार अनुभवण्यासाठी हजारो लोक दरवर्षी येथे येतात. येथे एका मोठ्या पाण्याच्या टँकमध्ये १६ फूट लांब अशी मगर राहते. या मगरीला अत्यंत जवळ तेही याच टँकमध्ये जाऊन पाहण्याची संधी येथल्या काही पर्यटकांना मिळते.
एका विशिष्ट पिंज-यात बसून एक किंवा दोन व्यक्तींना ही हिंस्त्र मगर पाहता येते. हा थरार अनुभवण्यासाठी जवळपास प्रत्येकी ८ हजार रुपये मोजावे लागतात. हिंस्त्र मगरीच्या टँकमध्ये जाण्याआधी प्रत्येकाला आधी काही मिनिटांची ट्रेनिंग दिली जाते. मगरीच्या टँकमध्ये गेल्यास काय करावे आणि कशी काळजी घ्यावी हे सगळे समजावून सांगितले जाते. मृत्यूच्या दाढेत जाण्याआधी हे ट्रेनिंग महत्त्वाचे आहे. त्यानंतर एका विशिष्ट् आणि सुरक्षित अशा पिंज-यात बंद करून एक किंवा दोन व्यक्तींना मगरीच्या टँकमध्ये सोडले जाते. या पंधरा मिनिटांत १६ फूट लांब असलेल्या मगरीला पाहण्याचा थरार लोकांना अनुभवता येतो. पण तो अनुभव घेत असताना प्रत्येकाला काही नियम पाळावे लागतात जर नियम तोडले तर मात्र हा थरार अंगाशी येऊ शकतो. साधरण १५ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती मगर पाहण्याचा हा थरार अनुभवू शकते.