Yusuf Dikec on Elon Musk : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये तुर्कियेचा नेमबाज युसूफ डिकेकची चर्चा काही थांबायला तयार नाही. एक हात खिशात आणि एका हातात पिस्तुल धरून नेम धरल्याचा त्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. कोणतेही इतर उपकरणे न वापरता युसूफने ५१ व्या वर्षी सहजपणे रौप्य पदक जिंकले, त्यामुळे त्याच्यावर अनेक मिम्स तयार केले गेले. एका दिवसात युसूफ डिकेक जगभरात चर्चेचा विषय ठरला. आता युसूफने एलॉन मस्क यांना विचारलेल्या एका प्रश्नाची चर्चा होत आहे. अतिशय शांत आणि संयम राखून खेळ सादर करणाऱ्या युसूफने मस्कला एक्स या साईटवर विचारले, “भविष्यात ऑलिम्पिकमध्ये रोबोट सहभागी होऊन मेडल जिंकू शकतील का? आणि तेही एक हात खिशात घालून”
तर विषय असा आहे की, युसूफ डिकेकने एलॉन मस्क यांना आवाहन करताना म्हटले होते की, एलॉन, भविष्यात रोबोट एक हात खिशात घालून ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकू शकतील काय? तुला याबद्दल काय वाटतं? आणि आपण या विषयावर इस्तंबूलमध्ये चर्चा केली तर कसे राहिल.” युसूफ डिकेकच्या या प्रश्नानंतर एलॉन मस्क यांनीही त्याला भन्नाट उत्तर दिले.
एलॉन मस्क म्हणाले की, होय, रोबोट प्रत्येकवेळी अचूक नेम शाधू शकतात. त्यानंतर आणखी एक पोस्ट करून युसूफच्या इस्तंबूल येथे येण्याच्या निमंत्रणाबाबतही मस्क यांनी उत्तर दिले. “मला इस्तंबूलne यायला आवडेल. जगातील सर्वात सुंदर शहरापैकी ते एक शहर आहे”, असेही मस्क म्हणाले.
युसूफ डिकेकने (Yusuf Dikec) १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याने या स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आहे. युसूफच्या रुपाने तुर्कियेला पहिले रौप्यपदक मिळाले. मात्र युसूफच्या साधेपणाचा स्वॅग जगातील अनेकांना आवडला. सोशल मीडियावर त्याचे मिम्स होऊ लागले. लोक त्याचे फोटो शेअर करून, कौतुक करू लागले. त्यामुळे एका रात्रीत युसूफ डिकेक आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरला.
हे ही वाचा >> Paris Olympics Medals: ऑलिम्पिकच्या गोल्ड मेडलमध्ये किती सोनं असतं? जाणून घ्या सोन्याचं प्रमाण
कोण आहे युसूफ डिकेक?
५१ वर्षीय युसूफने आतापर्यंत चारवेळा ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला आहे. २००८, २०१२, २०१६ आणि २०२० मध्ये त्याने तुर्कियेचे प्रतिनिधित्व केले आहे. ही त्याची पाचवी ऑलिम्पिक स्पर्धा होती. युसूफचा जन्म तुर्कियेमध्ये १९७३ साली झाला. लहान असतानाच त्यांना नेमबाजीची आवड निर्माण झाली. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आतापर्यंत सहभाग घेतलेला आहे. तेव्हाकुठे आता त्यांना रौप्यपदक जिंकता आले.
युसूफ डिकेक आणि एलॉन मस्क यांची चर्चा गंमतीचा भाग असली तरी त्यातून भविष्यातील क्रीडा प्रकारांबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. खरंच रोबोट भविष्यात क्रीडा प्रकारात भाग घेऊ शकतात का? मानवी क्षमतांवर रोबोट कसे मात करतील? या महत्त्वाच्या पैलूंची चर्चा युसूफ डिकेक यांनी सुरू करून दिली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd