मुंबई उच्च न्यायालयाने गोव्यातील एका हॉटेल मालकास ध्वनीप्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल १०,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. हॉटेलमध्ये आलेले ग्राहक आणि गाणी लावण्यासाठी वापरण्यात आलेले अ‍ॅमेझॉन अलेक्सा यांच्यामुळे ध्वनीप्रदुषण झाले असा आरोप हॉटेल मालकाने केला होता. पण उच्च न्यायालयाने हा आरोप नाकारत हॉटेल मालकाला दंड ठोठावला आहे.

“नोटीस पाठवताना काहीतरी गैरसमज झाला आहे, कारण गाणी अलेक्सामधुन सुरू होती. त्यामुळे मी ध्वनीप्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन केले नाही”, असा दावा याचिकाकर्ते डेक्सटर सॅवियो डीसूझा यांनी केला.

Viral Video : कार स्टंट करायला गेले अन् झाला मनस्ताप; व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

न्यायमूर्ती एम एस सोनक आणि आर एन लड्ढा यांच्या खंडपीठाने सोमवारी सांगितले की, “अलेक्सा किंवा गाणी लावणाऱ्या ग्राहकांवर ध्वनीप्रदूषणाचा आरोप करणे हे अकल्पित आहे. ज्या अधिकाऱ्यांनी ही नोटीस जारी केली आहे ते यापुढील कारवाई करतील. आम्हाला प्रथमदर्शनी असे वाटते की याचिकाकर्ते गाणी लावणाऱ्या ग्राहकांवर किंवा अलेक्सावर ध्वनीप्रदूषणाचा आरोप करू शकत नाहीत. जर अशा दाव्याची दखल घेतली गेली तर यापुढे अधिकाऱ्यांना ध्वनी प्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी करणे खूप कठीण होईल.”

खंडपीठाने सांगितले की, ” ध्वनी प्रदूषण मॉनिटर करणे खूप कठीण आहे. याचिकाकर्त्याविरुद्ध अनेक तक्रारींची नोंद आहे. २००० च्या ध्वनीप्रदूषण नियमांच्या अंमलबजावणीनुसार सर्वोच्च न्यायालय आणि या न्यायालयाने देखील याआधी निकाल दिले आहेत. कोणतीही शुल्लक कारणं देऊन या नियमांची अंमलबजावणी रोखता येणार नाही.”