राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांना मरणोत्तर किर्ती चक्र प्रदान केले. जुलै २०२३ मध्ये सियाचिन येथे आगीची घटना घडून अनेक लोक फसले होते, त्याठिकाणी बचाव कार्य करत असताना अंशुमन सिंह यांना वीरमरण आले. शुक्रवारी अंशुमन सिंह यांची पत्नी स्मृती सिंह, आई मंजू सिंह यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या क्रमाकांचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार स्वीकारला. यावेळी स्मृती सिंह यांनी कॅप्टन अंशुमन यांच्या आठवणींना उजाळा दिला. पहिली भेट कशी झाली, लग्न आणि भविष्यासाठी त्यांनी काय काय योजना आखल्या होत्या. मृत्यू होण्याच्या काही वेळापूर्वीच दोघांनी फोनवर पुढच्या आयुष्याबद्दल चर्चा केली होती, अशी भावनिक आठवण स्मृती सिंह यांनी सांगितली. दुरदर्शनला दिलेल्या मुलाखतीचा त्यांचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
पहिली भेट कधी झाली, याची आठवण सांगताना स्मृती सिंह म्हणाल्या, आम्ही महाविद्यालयात एकमेकांना भेटलो. पहिल्या दिवशीच मी त्यांच्या एकतर्फी प्रेमात पडले. महिन्याभरानंतर अंशुमन यांची निवड आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजसाठी झाली. आम्ही इंजिनिअरींग कॉलेजमध्ये भेटलो होतो, मात्र नंतर ते वैद्यकीय महाविद्यालयात गेले. ते अतिशय हुशार होते. आठ वर्ष आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो, त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.
स्मृती सिंह यांनी डीडी नॅशनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही माहिती दिली आहे. किर्ती चक्र पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले असताना त्यांनी दूरदर्शनशी संवाद साधला होता. अंशुमन सिंह यांच्याशी झालेला अखरेचा संवादही स्मृती सिंह यांनी सांगितला. “दुर्दैवाने आमच्या लग्नाच्या दोनच महिन्यानंतर त्यांची रवानगी सियाचिन येथे करण्यात आली. १८ जुलै रोजी आम्ही खूप वेळ फोनवर बोललो होतो. आमचे भविष्य कसे असेल, पुढची ५० वर्ष कशी असतील, घर कसं बांधायचं, मुलांना जन्म द्यायचा का, अशा विविध विषयांवर आम्ही गप्पा मारल्या. पण १९ जुलैच्या सकाळी मला फोन आला की, अंशुमन सिंह आता जगात नाहीत.
स्मृती सिंह यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. वीरपत्नीचा हा अनुभव ऐकून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. एक्सवर एका युजरने म्हटले, “कुटुंबावर एवढे मोठे संकट कोसळल्यानंतरही स्मृती सिंह यांनी स्वतःला सावरले. सिंह कुटुंबियांना सलाम.” आणखी एका युजरने म्हटले की, अंशुमन सिंह या शूरवीराला माझा सलाम. सियाचिन सारख्या भौगोलिकदृष्ट्या सर्वात आव्हानात्मक परिसरात आपल्या सहकाऱ्यांना वाचविण्यासाठी दिलेले बलिदान देश कधीही विसरणार नाही.
कॅप्टन अंशुमन सिंह यांचा जुलै २०२३ मध्ये मृत्यू झाला. सियाचिन येथे भारतीय लष्कराचा दारूगोळा आणि औषधांचा साठा असलेल्या ठिकाणी आग लागली होती. या आगीतून आपल्या सहकाऱ्यांचा जीव वाचवत असताना अंशुमन सिंह यांचा मृत्यू झाला.