Car Accident Video: सध्या रस्ते अपघातांचं प्रमाण खूप वाढत चाललंय. त्यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. एक अपघात आपल्याबरोबरच दुसऱ्याचं आयुष्यदेखील संपवू शकतो, हेदेखील आजकाल अनेकांना कळत नाही. यात कोणाचं नशीब चांगलं असेल तर तो वाचतो, नाहीतर असे भयंकर अपघात अनेकांचे जीवच घेतात.

सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात पालकांच्या एका चुकीमुळे लहान मुलगा धावत्या गाडीखालीच आला. नेमकं काय घडलं, जाणून घ्या…

चिमुकल्याचा थरारक अपघात (Little Kid Car Accident Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक लहान मुलगा रस्त्याच्या मधोमध बसला आहे. त्याचे पालक आजूबाजूला कुठेही दिसत नाहीयेत. तसंच आजूबाजूला जास्त माणसंही दिसत नाहीयेत. चिमुकला रस्त्याच्या मधोमध बसला असताना एक कार येते आणि ती कार चिमुकल्याला धडक देत त्याच्या अंगावरून जाते. इतक्यात एक माणूस धावत तिथे येतो आणि त्या लहान मुलाला गाडीखालून बाहेर काढतो. व्हिडीओमध्ये दिसतंय की मुलाची अवस्था खूप वाईट झालेली असते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @afreenas06 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “एका कारने खेळत असलेल्या मुलाला चिरडले.. उपचार घेत असताना त्या मुलाचा मृत्यू झाला. एका कारने अडीच वर्षांच्या मुलाला धडक दिली. ही घटना या महिन्याच्या १६ तारखेला घडली. एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्या मुलाचा मृत्यू झाला.” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला दोन लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “या मुलाचे पालक कुठे आहेत आणि तो असा रस्त्याच्या मधोमध का बसला आहे?” तर दुसऱ्याने “हा ड्रायव्हरसाठी ब्लाईंड स्पॉट असावा, यात पालकांचीपण खूप चूक आहे” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “ज्यांना बाळ होत नाही त्यांना किंमत विचारा”