Car Accident Video: ‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण अनेकदा वाचलं ऐकलं असेल. म्हणून उशीर होत असला तरी घाई न करता सुरक्षित प्रवास करावा, असं सांगितलं जातं. तरीही लोक आपलंच खरं करतात आणि अडचणीत सापडतात.
सोशल मीडियावर अनेकदा रस्ते अपघातांचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. त्यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असे भयंकर अपघात पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो.
रस्त्यावर वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवताना काही जणांना आजूबाजूच्या गोष्टींचं भानच नसतं आणि हेच कारण अनेक अपघातांना पुरेसं ठरतं. सध्या सोशल मीडियावर एका अशाच अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात हायवेवर वेगात गाडी चालवल्यामुळे भयंकर अपघात झाला.
अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
अपघाताचा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धडकी भरेल. या व्हिडीओमध्ये हायवेवरून भरवेगात एक कार दुसऱ्या कारला ओव्हरटेक करायला जाते. ओव्हरटेक करताचक्षणी त्या कारची धडक दुसऱ्या कारला लागते आणि मोठा अपघात होतो. या अपघातात एका गाडीचा चक्काचूर होतो तर दुसरी गाडीदेखील तोल जाऊन पलटी होते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल की, असा अपघात कोणाच्या नशिबी येऊ नये. दरम्यान, ही धक्कादायक घटना नेमकी कुठे आणि कधी घडली हे अद्याप कळू शकलं नाही. तरी या अपघातात दोन्ही गाड्यांचं खूप मोठं नुकसान झाल्याचं दिसून येतंय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @amanti_driving_school_trics या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “हायवेला ओव्हरटेक करत असताना अति घाई करू नये” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.३ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया
अपघाताचा हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मूर्खपणा आहे सगळा, यांना कुठे जायची घाई असते काय माहीत”; तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “लोकांमध्ये अजिबात संयम उरला नाही, कुठेही लोकांशी स्पर्धा करू लागलेत”, तर तिसऱ्याने “कार म्हणजे त्यांना वाटतं विमान आहे, कसंही उडवा” अशी कमेंट केली.