Car Driver Accident Prank College Students : आपल्याकडे रस्त्याच्या मधोमध जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणाऱ्यांची कमी नाही, पोलीस अशा स्टंटबाजांवर कारवाई करूनही ते सुधारण्याचे नाव घेत नाहीत. त्यात हल्ली काही लोक तर कॉलेजबाहेरील विद्यार्थ्यांबरोबर अपघातांचे प्रँक करताना दिसत आहेत. प्रँकच्या नादात हे लोक कॉलेजबाहेरील रस्त्यांवर चालणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर, तर कधी पायांवर गाडी घालताना दिसतात. इतकेच नव्हे, तर अशा जीवघेण्या प्रँकचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले जातात. असाच एक प्रकार नोएडामधून समोर आला आहे. त्यात एक तरुण कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांबरोबर अपघाताचा प्रँक करीत होता. मात्र, हा प्रकार पोलिसांना समजताच त्यांनी संबंधिताला अशी काय अद्दल घडवली की, तो पुन्हा कोणाबरोबर असे काही करणार नाही. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भरकॉलेजमध्ये विद्यार्थ्यांबरोबर प्रँक

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कार चालविणारी एक व्यक्ती कॉलेजबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांबरोबर प्रँक करताना दिसत आहे. ती व्यक्ती भरधाव कार विद्यार्थ्यांच्या अगदी जवळ घेऊन जाते. त्यानंतर हॉर्न वाजवून ब्रेक दाबते. त्यात कधी विद्यार्थ्यांच्या अंगावर, तर कधी पायांजवळ गाडी घेऊन जात थांबते. पण, भरधाव कार येताना पाहून अनेक विद्यार्थी घाबरून जात आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

लोकांनी संबंधित कारचालकाविरोधात पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांबरोबर असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई का केली जात नाही, असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. त्यावर नोएडा पोलिसांनी कारवाईचे आश्वासन देत आरोपीविरोधात चालान बजावले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा ट्रॅफिक पोलिसांनी प्रँक कारसाठी २६ हजार रुपयांचे चालान जारी केले आहे. पोलिसांनी एकूण सहा कलमांतर्गत कारला चालना दिली; ज्याची एकूण रक्कम २६ हजार रुपयांवर पोहोचली.
.

घराला नजर लागू नये म्हणून पठ्ठ्याने केले असे काही की…, Video पाहून बसेल धक्का! युजर म्हणाला, “हे पाहून भूत…”

नोएडा ट्रॅफिक पोलिस अशा घटनांना आळा घालण्यासाठी सतत चालान जारी करीत आहेत; पण अशा घटना आणि स्टंट किंवा रील तयार करणे थांबण्याचे नाव घेत नाहीत.

दररोज वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असून, लोकांच्या जीवाशी खेळले जात आहे. गेल्या आठवड्यातच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारच्या स्टंटबाजीचे चार व्हिडीओ समोर आल्यानंतर नोएडा ट्रॅफिक पोलिसांनी एकूण १,५६,५०० चे चालान जारी केले आहे.