Cat Dancing Video: बऱ्याच जणांना घरामध्ये कुत्रा, मांजर असे प्राणी पाळायला आवडतात. अनेकजण पाळलेल्या लाडक्या प्राण्याचे फोटो, व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. फेसबुक, इन्स्टाग्राम या माध्यमांवर मांजरांचे असंख्य व्हिडीओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ पाहून खूप हसायला येते. तर काही व्हिडीओ आपल्याला भावूक करुन जातात. तर काही व्हिडीओ एकदा पाहिल्यावर पुन्हा-पुन्हा पाहत राहावे असे वाटते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक छोटी मांजर डान्स करत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत मांजर एका अरेबियन गाण्यावर बेली डान्स करत असल्याचे पाहायला मिळते. त्या मांजरीच्या मालकाने तिला बेली डान्सर जसे कपडे परिधान करतात, तसे कपडे शिवले आहेत हेदेखील व्हिडीओमध्ये दिसते. कपड्यांव्यतिरिक्त मालकाने त्या मांजरीच्या गळ्यामध्ये छोटा कापडांच्या गोळ्यांचा हार घातला आहे. शिवाय डोक्यावर एक चमकणारा मणी लावल्याचे दिसते. मांजरीचा मालक तिला अशा प्रकारे नाचवत आहे की, ज्यामुळे ती मांजर स्वत:हून नाचत आहे असा भास होतो. एखाद्या प्रोफेशनल बेली डान्सरप्रमाणे ती कंबर हलवत नाचत आहे.
@inscatgram नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला तब्बल १०.२ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ६ लाखांपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ लाइक केला आहे. व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी व्हिडीओवर हसायचे इमोजी कमेंट केले आहेत. एका यूजरने ‘२ वेळच्या जेवणासाठी काय-काय करावं लागतंय असं ती मांजर म्हणत असेल’ अशी गंमतीदार कमेंट केली आहे. तर दुसऱ्या यूजरने ‘या जगात बेली डान्स करणाऱ्या आणखी मांजरी असायला हव्यात’ असे म्हटले आहे. याशिवाय काहीजणांनी ती मांजर खूश नसल्याचे दिसते अशा प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.