कधी निष्काळजीपणामुळे तर कधी व्हिडीओ बनवण्याच्या नादात अनेक लोक भरधाव रेल्वेला धडकतात या बाबतच्या घटनांशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतेच रील करण्याच्या नादात एक मुलगा रेल्वेला धडकला आणि त्याचा जागीच मृत्यू झालाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशातच आता अशीच एक धक्कादायक घटना बिहारमधून समोर आली आहे. येथील बगहा रेल्वे स्टेशनवर एक तरुण रेल्वे रुळावर पडला होता यावेळी तेथून एक भरधाव रेल्वे जात होती. सुदैवाने या तरुणाला काही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, या घटनेचा व्हिडीओ मात्र अंगावर शहारा आणणारा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय प्रतीक कुमार बेतियाच्या उत्तरवारी पोखरा भागातील रहिवासी आहे. शीतपेय आणि बिस्किटे घेण्यासाठी तो रेल्वेतून खाली उतरला होता. खाद्यपदार्थ घेऊन तो परत रेल्वेच्या दिशेने आला तेव्हा रेल्वे सुरू होऊन पुढे जात होती. त्यामुळे रेल्वे निघून जाईल या भीतीने तो भरधाव वेगाने जाणाऱ्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करु लागला आणि याचवेळी त्याचा पाय घसरल्याने तो रुळाच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत पडला.
स्टेशनवर गोंधळ –
हा तरुण रुळाच्या आणि फलाटाच्या रिकाम्या जागेत पडल्यानंतर स्टेशनवर एकच गोंधळ उडाला. स्टेशनवर तैनात जीआरपी आणि इतर प्रवासी खाली पडलेल्या तरुणाच्या मदतीसाठी धावले, परंतु त्याला लगेच बाहेर काढता आले नाही कारण यावेली रुळावरून रेल्वे जात होती. त्यामुळे यावेळी सर्वांनी त्याला शांत राहण्याचा आणि हालचाल न करण्याचा सल्ला दिला.
तरुणाला झाली किरकोळ दुखापत –
रेल्वे पुढे गेल्यावर एका पोलिस कर्मचाऱ्याने आणि काही प्रवाशांनी त्याला रुळावरून उचलले आणि प्लॅटफॉर्मवर नेले. या घटनेत प्रतीक कुमारला किरकोळ दुखापत झाली असून त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तर या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रवास करताना नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी अन्यथा असा अपघातांचा सामना करावा लागू शकतो असं नेटकरी म्हणत आहेत.