मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. ८ जुलै रोजी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. लोकल फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. तर, रस्त्यावर पाणी साचल्याने रस्तेवाहतूकही ठप्प झाली होती. परिणामी कार्यालयातून घर गाठणे चाकरमान्यांसाठी कठीण गेले. याच काळात मुंबईतील विविध कोपऱ्यातून अनेक बातम्या येत होत्या. पाणी साचणे, तुंबने, लोकल बंद पडलणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण येणे आदी समस्या प्रत्येक पावसाळ्यात जाणवतात. पण यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना भलतंच दृष्य पाहायला मिळालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते जलमय झाले होते. रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली होती. सोमवारी दिवसभर उसंत घेतलेल्या पावसाने सायंकाळनंतर पुन्हा मुंबई आणि उपनगराला पावसाने झोडपले आणि मंगळवारी पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली. मंगळवारी दिवसभर मुंबई आणि परिसरात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. या दरम्यान मुंबईतील एका रेल्वे स्थानकातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये काही मासे रुळांवर तरंगताना दिसत आहेत.

हेही वाचा >> शाळेभोवती तळे न साचताही सुट्टी!

अनेकदा कुत्रे किंवा इतर आजूबाजूच्या परिसरातील भटके प्राणी लोकलमध्ये चढतात. परिणामी प्रवाशांमध्ये गोंधळ उडतो. परंतु, आता चक्क मासेच रुळांवर आल्याने हे मासे आले कुठून असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान, हे कॅटफिश असून पावसाळ्यात हे कॅटफिश आजूबाजूच्या तलाव किंवा जलकुंभातून येत असतात, असं एका युजरने म्हटलं आहे. या कॅटफिशला मराठीत शिंगळा असं म्हणतात.

हेही वाचा >> रायगडाचे रौद्र रूप दर्शविणारा नवा व्हिडीओ चर्चेत! गड किल्ल्यांवर जाताना काळजी घ्या

रेल्वे रुळांवर आलेल्या माशांचा अर्थ काय?

या घटनेमुळे शहरातील ड्रेनेज सिस्टम क्षमतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पावसाळ्यात अनेकदा भीषण पुराचा सामना करणाऱ्या मुंबई शहराला वर्षानुवर्षे पाणी व्यवस्थापनाच्या समस्यांशी झगडावे लागत आहे. रेल्वे रुळांवर कॅटफिश दिसणे शहराच्या अतिवृष्टीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि अशा घटना टाळण्यासाठी सुधारित पायाभूत सुविधांची आवश्यकता अधोरेखित करते, असं एका युजरने म्हटलंय. तर, हे ट्रेन ट्रॅक आहे की फिश टँन्क आहे असा खोचक प्रश्नही एका नेटिझननने विचारला आहे. तसंच, अनेक मासेमार माशांची रेल्वेने वाहतूक करतात. त्यांच्याच टोपलीतून हे मासे पडले असतील, असं काही नेटझन्सने म्हटलं आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ कोणत्या रेल्वे स्थानकातील आहे हे अद्यापही समोर आलेलं नाही. सोशल मीडियावरील चर्चेनुसार, हा व्हिडिओ सायन, डोंबिवली, बोरिवली किंवा नालासोपारा येथील असण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय.