Viral Video: सोशल मीडियावर एखादं नवीन गाणं प्रदर्शित झालं की, ते खूप चर्चेत येतं. चर्चेत असलेल्या या गाण्यांवर लाखो लोक रील्स, व्हिडीओ बनवतात. अगदी भारतीयच नव्हे, तर परदेशांतील कलाकारही या गाण्यांवर ठेका धरतात. तसेच लहानांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना या ट्रेंडिंग गाण्यांवर व्हिडीओ बनविल्याशिवाय राहवत नाही. आतापर्यंत ‘गुलाबी साडी’, ‘बहरला हा मधुमास’ अशी अनेक मराठी गाणी चर्चेत आली आहेत; ज्यांचे रील्स प्रचंड चर्चेत आले आहेत. सध्या सोशल मीडियावर ‘आप्पांचा विषय लय हार्ड’ हे मराठी गाणं खूप चर्चेत आहे; ज्यावर अनेक जण रील्स बनविताना दिसत आहेत. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये चक्क एका बोक्याचे रिल बनवले जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
कुत्रा असो किंवा मांजर या दोन्ही प्राण्यांना अनेक लोक जीव लावतात, त्यांना सांभाळतात. घरातील इतरांइतकेच महत्त्व देतात. त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवतात. काही जण या प्राण्यांचे वाढदिवस साजरे करतात, तर कधी त्यांना त्यांच्या आवडीचे कार्टूनदेखील दाखवतात. हल्ली अनेक जण आपल्या प्राण्यांसोबत रीलदेखील बनविताना दिसतात. आतादेखील एकाने बोक्यासोबत रील बनवले आहे आणि तो सध्या खूप चर्चेत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एकाने त्याच्या घरातील पाळीव बोक्याला एका ठिकाणी बसवले आहे. यावेळी बोक्याच्या डोक्यावर तो गांधी टोपी घालतो. त्यानंतर तो त्याच्या डोळ्यांवर गॉगल लावतो, त्याच्या कपाळावर लाल टिका लावतो. त्याशिवाय यावेळी बोक्याच्या गळ्यात चेनदेखील घातलेली दिसत आहे. यावेळी तो बोकादेखील हटके एक्स्प्रेशन देताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये, “आमचे टायसन आप्पा”, असे लिहिले आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @purple_thepersian_9 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज मिळाल्या आणि एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
यावर एका युजरने लिहिलेय, “आप्पा खूप गोड आहे.“ दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “आप्पांचा रुबाब लय भारी.” तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “आप्पाचा पासवर्ड म्याव म्याव असेल.” आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “खूप गोड आप्पा.”
दरम्यान, यापूर्वीही अनेकांनी या गाण्यावर रील्स बनवल्या आहेत. तसेच यापूर्वी एका मांजरीला असेच सजवून गुलाबी साडी या गाण्यावर रील्स बनवल्या होत्या. या रील्स सोशल मीडियावरदेखील खूप व्हायरल झाल्या होत्या.