राज्यात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. अशात लोक थंडीपासून वाचण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत; तर काही लोक शेकोटीची मदत घेताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी लोक घोळका करून शेकोटीजवळ गप्पागोष्टी करताना दिसत आहेत. मात्र, हीच गोष्ट एका कुटुंबाला चांगलीत महागात पडली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एका घराबाहेर शेकोटी घेत असताना शेकोटीत अचानक स्फोट झाला.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ पंजाबमधील अमृतसरमधील आहे; ज्यात तुम्ही पाहू शकता की, एका कुटुंबातील काही सदस्य घराबाहेर आरामात एका शेकोटीभोवती गप्पागोष्टी करीत बसलेले आहेत. सर्व जण गप्पांमध्ये व्यग्र असताना अचानक शेकोटीमध्ये जोरात स्फोट होतो. स्फोट होताच सर्व जण उठून दूर पळतात. हे कुटुंबीय शेकोटीपासून थोडे लांब बसलेले असल्याने सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
खासगी बसचालकाला ‘ही’ एक चूक पडली महागात! प्रवाशाला द्यावी लागली दोन लाखांची नुकसानभरपाई
शेकोटीच्या स्फोटाचा हा व्हिडीओ @Gagan4344 या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे; ज्याच्या कॅप्शनमध्ये स्फोटामागचे नेमके कारण सांगण्यात आले आहे. खाली कोणतीही वाळू न वापरता, थेट सिमेंटच्या फरशीवर लाकूड ठेवून शेकोटी पेटवण्यात आली. त्यामुळे उष्णतेचा दाब निर्माण होऊन हा स्फोट झाला. दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे; ज्यावर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. अनेकांनी हे कुटुंब सुखरुप असल्याने देवाचे आभार मानले आहेत.