Hospital Staff Hits Patient : रुग्णसेवा देणाऱ्या प्रत्येकाला आपण देव मानतो. डॉक्टर, डॉक्टरेतर कर्मचारी आपल्याला सर्व आजारपणातून बाहेर काढतात, असं आपण मानतो. त्यांना आपण ‘देवमाणूस’ म्हणतो. अर्थात, काही डॉक्टर हे स्वत:ला रुग्णसेवेत झोकूनही देतात. दरम्यान, सध्या एक अतिशय धक्कादायक आणि रुग्णालयातील पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. त्यामध्ये रुग्णालयातील कर्मचारी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला मारहाण करताना दिसत आहेत. हा कर्मचारी वृद्ध रुग्णाच्या पोटात अक्षरश: हाताच्या कोपराने जोरजोरात मारत आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून, व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
व्हिडीओमध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा गणवेश परिधान केलेला दिसतो आणि तो रुग्ण झोपलेल्या खाटेजवळचा पडदा हलवतो. त्यानंतर तो रुग्णाच्या जवळ येतो आणि पडदा बंद केल्यानंतर हाताच्या कोपराने त्याच्या पोटात मारतो. वॉर्डात लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा त्याच्या नजरेस पडतो आणि नंतर तो घटनास्थळावरून पळून जातो. दरम्यान, घटनेचे नेमके ठिकाण अद्याप समजू शकलेले नाही आणि रुग्णाशी क्रूररीत्या वागताना दिसलेल्या व्यक्तीची ओळखही पटलेली नाही. त्याच्या या अमानुष कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून त्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी (१९ जून) घडली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजसह व्हिडीओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.
प्रो. सुधांशू त्रिवेदी यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून, ‘लोकांनी डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला आहे; पण इथे डॉक्टर सैतानाच्या रूपात आहे’, अशी कॅप्शन दिली आहे. तर इतर सोशल मीडिया वापरकर्ते त्यांचा दावा नाकारत व्हिडीओमध्ये दिसणारा माणूस डॉक्टर नसून वॉर्डबॉय किंवा हॉस्पिटलचा अन्य कर्मचारी आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> ‘आयुष्यात एका सेकंदाचं महत्त्व काय?’ एका पावलाच्या अंतरावर होत्याचं नव्हतं झालं; ‘हा’ VIDEO बघून उडेल झोप
एका युजरने म्हटले आहे, “डॉक्टरांना देव मानले जाते; पण प्रत्येक डॉक्टर सारखा नसतो. कदाचित या प्रकरणात डॉक्टरांची भूमिका खूप वाईट असेल. जर त्याने काही चुकीचे केले असेल, तर तक्रार दाखल करा; जेणेकरून कठोर कारवाई होईल आणि चांगले डॉक्टर मिळू शकतील.” आणखी एका युजरने म्हटले आहे, “या डॉक्टरवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याची डिग्री रद्द करण्यात यावी. असे लोक डॉक्टर नव्हे, तर सैतान म्हणण्यास पात्र आहेत.”