Viral video: पूर्वीचा काळ असा होता की, खासगी शाळांमध्ये मुख्याध्यापक किंवा शिक्षकांकडून मुलांना फीबाबत अडवणूक केली जात असे. किंवा पालकांना घरून बोलावून आणण्याचे आदेश दिले जात होते. पूर्वी मुले शाळेत शिक्षकांकडून शिवीगाळ आणि मारहाणही सहन करत असत, परंतु आजकालची मुलं हे सगळं सहन करत नाहीत.
गृहपाठ केला नाही, पाठांतर झाले नाही तर शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांवर ओरडतात व शिक्षा करतात; मात्र विद्यार्थ्यांना मारायचे बंद करण्यात आले आहे. पालकही शिक्षकांना भेटून पाल्याला न मारण्याचे सांगतात. मुलांना ओरडू नका, काय असेल तर आम्हाला सांगा, आम्ही अभ्यास करून घेतो, अशी विनवणी पालकांकडून होत असल्याने शिक्षकांनीही मुलांना मारणे बंद केले. विशेष म्हणजे, पूर्वी शिक्षकांनी मुलांना मारले तर पालक काहीच म्हणत नव्हते. अभ्यासात विद्यार्थी मागे असेल तर त्याच्याकडून अभ्यास करून घेण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करतात. अनेकदा त्यांना ओरडून परिस्थितीनुरूप शिक्षा केली जाते; परंतु आरटीई कायद्यांतर्गत मानसिक, शारीरिक छळ या कायद्याखाली शिक्षकांना शिक्षा होऊ शकते, यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार देणे बंद केले आहे. मात्र, सध्या समोर आलेले प्रकरण पाहून डोक्याला हात माराल आणि म्हणाल, एवढी हिंमत येतेच कुठून?
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांना मारल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्याध्यापकांनी फीसाठी विचारणा केली असता विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांमध्ये वाद झाला आणि यावेळी मुख्याध्यापकांनी मुलावर हात उचलला. यानंतर मुलानेही मुख्याध्यापकांना मारायला सुरुवात केली. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका खासगी शाळेत महिला प्राचार्य निशा सेंगर आणि ११वीचा विद्यार्थी ध्रुव आर्य यांच्यात फीवरून वाद झाला. प्राचार्यांनी आधी ध्रुववर हात उचचला. यानंतर ध्रुवने प्रत्युत्तर म्हणून मुख्याध्यापकांना चापट मारली. यावेळी इतर शिक्षकांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. या घटनेनंतर विद्यार्थी ध्रुवच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याध्यापकासह तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओ पाहा आणि आता तुम्हीच सांगा, यामध्ये नेमकी चूक कोणाची?
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “लाडक्या बहिणीचे तीन हजार आले, घ्या वीसचे चार समोसे” ट्रेनमधल्या विक्रेत्याचा VIDEO व्हायरल; शेवट पाहून पोट धरुन हसाल
मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुवने दोन वर्षांपूर्वी शाळा सोडली होती आणि तो बदली प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका घेण्यासाठी शाळेत गेला होता. यावेळी शाळेची फी भरण्यावरून दोघांमध्ये वाद झाला, त्यानंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. दरम्यान, मुख्याध्यापकांनी जातीच्या आधारे शिवीगाळ केली आणि मारहाणही केली, असा विद्यार्थ्याचा दावा आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये महिला मुख्याध्यापिका एका मुलावर हात उचलताना दिसत आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी मुख्याध्यापिका निशा सेंगर सांगतात की, ध्रुव आर्य हा मार्कशीट घेण्यासाठी आला होता. त्याच्याकडे शाळेची फी थकीत होती. फी जमा करण्यास सांगितले असता त्याने शिक्षकांशी गैरवर्तन केले. यानंतर हा वाद वाढतच गेला. निशा सेंगर यांनी जातीशी संबंधित शब्दांचा वापर हा आरोप खोटा असल्याचे म्हटले आहे.