दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विक्रीला सुप्रीम कोर्टाने मंगळवारी सशर्त परवानगी दिल्यामुळे यंदा कोर्टाच्या नियमांमध्ये राहूनच दिवाळी साजरी करवी लागणार आहे. फटाके विक्रीबाबत अंशतः घातलेली बंदी ही देशभरात लागू असून पर्यावरण रक्षणासाठी या आदेशांचे नागरिकांनी पालन करावे असे न्या. ए. के. सिक्री आणि न्या. अशोक भुषण यांनी निर्णय देताना म्हटले आहे. याच निर्णयाचा मान ठेवत दिल्लीमध्ये यंदा चक्क आगळ्यावेगळ्या पद्धतीने चक्क तोंडानेच ‘ठाय… ठाय…’ आवाज करून दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.

या इको फ्रेण्डली ‘ठाय… ठाय…’ दिवाळी मागील प्रेरणा मिळाली आहे ती उत्तर प्रदेश पोलिसांच्या एका कारनाम्यामुळे. रिव्हॉल्वरमधून गोळ्या निघत नसल्याने ‘ठाय… ठाय…’ करत तोंडाने आवाज काढणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यावरूनच या इको फ्रेण्डली दिवाळी सेलिब्रेशनची कल्पना समोर आली आहे. फेसबुकवरील ‘द वॅण्डर बॉटल’ या ग्रुपने तोंडाने ‘ठाय… ठाय…’ आवाज करुन दिवाळी साजरी करण्यासाठीचा इव्हेन्ट तयार केला आहे. दिल्लीमधील कॅनॉट प्लेस परिसरामध्ये ४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता सर्वांनी एकत्र येऊन ‘ठाय… ठाय…’ आवाज करत दिवाळी साजरा करण्यात येणार आहे.

या आगळ्या वेगळ्या दिवाळीची कल्पना नेटकऱ्यांना खूपच आवडली असून. चक्क दोन हजार ३०० हून अधिक नेटकऱ्यांनी या इव्हेनला ‘गोईंग’ असं म्हणत उपस्थित राहणार असल्याचे सांगितले असून १२ हजारहून अधिक जणांनी या इव्हेन्टसाठी आपण ‘इन्ट्रेस्टेड’ असल्याचं म्हटलं आहे. या ग्रुपने गरीब मुलांना दिवाळीनिमित्त काही भेटवस्तू देण्यासाठी सदिच्छा देणगी देण्याचीही विनंती आपल्या इव्हेन्ट पेजवर केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये एका चकमकी दरम्यान गुंडावर गोळीबार करताना एका पोलील अधिकाऱ्याची रिव्हॉल्वर खराब झाल्याने त्यामधून गोळ्या निघत नसल्याने सहकारी पोलिसाने तोंडाने ‘ठाय… ठाय…’ असे गोळ्यांचे आवाज काढल्याचा व्हिडीओ चांगलाच गाजला होता. त्यानंतर सोशल मिडियावर अनेक विनोद व्हायरल होत असतानाच आता यावरून चक्क एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

अनेक दिल्लीकरांनी या ठाय ठाय दिवाळीमुळे फटाक्यांचे प्रमाण कमी होऊन कमीत कमी दिल्लीची हवा तरी शुद्ध राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.