Cricket Ground Turns Into Fight Video: बांगलादेशमध्ये झालेल्या सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या सामन्यात खेळाडूंमध्ये झालेल्या जोरदार भांडणाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ढाका येथील सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये चित्रपट निर्माते मुस्तफा कमल राज यांची टीम आणि दीपंकर दीपॉनची टीम यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडली. सामन्याच्या दरम्यान अधिकाऱ्यांनी चौकार नाकारल्याने वादाला सुरुवात झाली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोन्ही संघातील अनेक खेळाडू हाणामारी करताना दिसत आहेत. यावेळी खेळाडू एकमेकांना अक्षरशः बुक्के मारताना किंचाळताना दिसत आहेत.
सुरक्षा कर्मचारी आणि अधिकारी हस्तक्षेप करत वाद थांबवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते पण वातावरण एवढे तापले होते की कोणताही गट शांत होण्यास तयार नव्हता. प्राप्त माहितीनुसार या मारामारीत सहा जण जखमी झाले आहेत. शिशिर सरदार, राज रिपा, जॉय चौधरी, अतिक रहमान, शेख शुभो आणि आशिक जाहिद अशी जखमींची नावे आहेत.
राज रिपा यांनी याविषयी फेसबुक पोस्टमध्ये माहिती दिली आहे. यामुळे तिच्या करिअरचं काहीही नुकसान झालं तर यासाठी मुस्तफा कमाल राज जबाबदार असेल असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे. विरुद्ध संघातील खेळाडूंनी तिच्यावर पाण्याच्या बाटल्या फेकल्याचाही तिने आरोप केला आहे. या अनपेक्षित परिस्थितीनंतर ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.
हे ही वाचा<< “तृतीयपंथी महिलेमुळे माझं पदक गेलं, याला..”, आशियाई क्रीडा स्पर्धेतील ‘स्वप्ना’ची पोस्ट; वाद चिघळताच बर्मनने..
दरम्यान, या सामन्यादरम्यान सेलिब्रिटींनी दाखवलेल्या हिंसक वर्तनाबद्दल क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर नियम करण्यात यावेत अशीही मागणी करण्यात येत आहे.