शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असल्याचे अनेकदा म्हटले जाते. जाहिरातींमध्येही शेअर मार्केटमध्ये स्वत:च्या रिक्सवर गुंतवणूक करा असे सांगितले जाते. पण शेअर मार्केटमधील गुंतवणूक काहीवेळा किती फायदेशीर ठरू शकते हे चंढीगडचे रहिवासी डॉ. तन्मय मोतीवाला यांच्यापेक्षा चांगले कोणीही सांगू शकत नाही. कारण तन्मय मोतीवाला यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय, ज्यात त्यांनी ३० वर्षांपूर्वी आजोबांनी खरेदी केलेल्या ५०० रुपयांच्या शेअरच्या बदल्यात आता त्यांना किती लाखांचा फायदा झाला हे सविस्तररित्या सांगितलेय.
१९९४ मध्ये त्यांच्या आजोबांनी ५०० रुपयांचा शेअर विकत घेतला होता ज्याचे पेपर त्यांना आता ३० वर्षांनंतर मिळाले.
५०० रुपयांच्या शेअरची किंमत ७५० पटीने वाढली
३० वर्षांपूर्वी आजोबांनी विकत घेतलेल्या शेअर्सची किंमत आता ७५० पट वाढली आहे. तन्मय मोतीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “माझ्या आजोबांनी १९९४ मध्ये ५०० रुपयांचा शेअर खरेदी केला होता. हा शेअर स्टेट बँक ऑफ इंडियाचा होता. आजोबांनी ५०० रुपये गुंतवले होते याची मला कल्पना नव्हती. त्यांनी तो कशासाठी विकत घेतला होता हे मला माहीत नाही, पण मी ३० वर्षांपासूनची माझ्या कुटुंबाच्या संपत्तीविषयीची कागदपत्र गोळा करत असताना मला त्या गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे सापडली.”
रक्कम मिळण्यात आल्या अडचणी
मोतीवाल पुढे म्हणाले की, मला मिळालेल्या कागदपत्रांनुसार त्या शेअरचे मूल्य ७५० पटीने वाढले आहे. तन्मयच्या त्या शेअरची आजची किंमत ३.७५ लाख रुपये आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, “मी अनेकांना विचारले की त्याची सध्याची किंमत काय आहे, अनेकांनी योग्य माहिती दिली नाही, पण हो, त्याचा नफा ३० वर्षांत ७५० पटीने वाढला आहे. प्रत्यक्षात ही मोठी रक्कम आहे. पण ती मिळवताना खूप समस्या येतील कारण त्याच्या प्रक्रियेसाठी बरीच कागदपत्रे सादर करावी लागतील.
व्हायरल पोस्टवर लोकांच्या प्रतिक्रिया
तन्मय मोतीवाल यांची ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यांची ही पोस्ट अशा लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत आहे जे जोखमीमुळे किंवा दीर्घ प्रतीक्षेमुळे संकोच करतात. त्यांच्या या पोस्टवर लोक कमेंट करत आहेत. यालाच खरी गुंतवणूक म्हणतात, गुंतवणूक म्हणजे काय आपल्या ज्येष्ठांकडून शिकले पाहिजे अशी कमेंट एका यूजरने केली आहे. दुसऱ्या एका युजरने म्हटले की, माझ्यासोबतही असे घडले जेव्हा माझ्या आजोबांकडे SBI चे ५०० शेअर्स होते आणि ते एक कर्मचारी होते, माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर कसे तरी मला हे बाँड मिळाले, मी १७ वर्षांचा होतो, नंतर जवळचे शेअर्स ब्रोकरकडे गेलो आणि काही प्रक्रियेनंतर आम्ही ते विकू शकलो, अशा प्रकारे मी इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.