Chandrayaan 3 Viral Sand Art Image : देशासाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण ४ वर्षांच्या मेहनतीनंतर अखेर ‘चांद्रयान-३’ अवकाशात झेपावलं आहे. श्रीहरीकोटा सतीश धवन अवकाश केंद्रावरुन दुपारी २. ३५ मिनिटांनी ते अवकाशात झेपावले. यानंतर २३ ऑगस्ट रोजी ते चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. देशासाठी नक्कीच हा अभिमानाचा क्षण आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही ‘चांद्रयान-३’ मोहिमेला शुभेच्छा देणारे अन् इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करणारे पोस्ट, मेसेजेस, व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनीही ‘चांद्रयान-३’ मोहिमेला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. ज्या पाहून तुमचेही मन खूश होईल. पटनायक यांनी पुरीच्या किनाऱ्यावर खास पद्धतीने ‘चांद्रयान-३’ मोहिमेचे कौतुक करत इस्रोच्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या आहेत. वाळूवर त्यांनी एक अप्रतिम सॅटेलाइट आर्ट तयार केले आहे.
‘विजयी भव’ म्हणत दिल्या शुभेच्छा
कलाकार पटनायक यांनी ट्विटरवर शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चांद्रयान-३’ मोहिमेसाठी इस्रोच्या टीमला शुभेच्छा. मी हे वाळू शिल्प ३०० स्टीलच्या वाट्यांचा वापर करुन बनवले आहे. विजयी भव, पुरी बीच (ओडिशा). पटनायक यांनी त्यांच्या खास शैलीतून दिलेला शुभेच्छा आता युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. काही तासांपूर्वी केलेल्या या पोस्टला ट्विटरवर ७ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर युजर्स त्यावर भरभरून कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले की, खूप छान सुदर्शन बाबू.
पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पटनायक यांनी ‘चांद्रयान-३’ ची २२ फूट लांबीचे वाळू शिल्प बनवले आहे. यामध्ये त्यांनी १५ टन वाळू वापरली आहे. एवढेच नाही तर यासाठी त्यांना शाळेतील विद्यार्थ्यांनीही मदत केली आहे.
‘चांद्रयान- ३’ नेमकं काय आहे?
चांद्रयान-३ हे चांद्रयान-2 चा फॉलो-अप मिशन आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे सॉफ्ट लँडिंग करणे हा त्याचा उद्देश आहे. चांद्रयान-2 मध्ये विक्रम लँडरचे क्रॅश लँडिंग झाले होते. त्याचे अवशेष अमेरिकन अंतराळ संस्थेला तीन महिन्यांनंतर सापडले. यानंतर चार वर्षांनंतर इस्रो ‘चांद्रयान-३’ च्या माध्यमातून पुन्हा लँडर आणि रोव्हर दक्षिण ध्रुवावर लँड करण्याचा प्रयत्न करणार आहे. यातील रोव्हर हा एक सहा चाकी रोबोट आहे, जो लँडरच्या आत असेल, तो लँडिंगनंतर बाहेर येईल.