Chandrayaan-3 Moon landing: चांद्रयान -३ मोहिमेच्या यशामुळे आता २३ ऑगस्ट २०२३ हा दिवस भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. इस्रोचे चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरण्यात यशस्वी झाले. यामुळे भारत आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला आहे. इस्रोच्या या यशस्वी कामगिरीमुळे भारतीयांचा आनंद गगणात मावेनासा झाला. अनेक ठिकाणी चांद्रयान-३ मोहिमेचे मोठ्या स्क्रीनवर थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. आपल्या भारताच्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार म्हणून मुंबईतील अंधेरी स्थानकावरही प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. यावेळी प्रवाशांनी मोठमोठ्याने घोषणा देत संपूर्ण स्टेशन परिसर दणाणून सोडला. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मुंबईकरांनी चांद्रयान-३ चे लँडिंग होताच केलेल्या घोषणा ऐकून तुमच्या अंगावर काटे उभे राहतील.
इस्रोने मोहीम यशस्वी झाल्याची घोषणा होताच संपूर्ण अंधेरी स्टेशन परिसर वंदे मातरम, भारत माता की जय, हिंदुस्थान झिंदाबाद, गणपती बाप्पा मोरया न मातरमच्या घोषणांनी दुमदुमले गेला होता. सतत घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या अनेक मुंबईकर काहीवेळ थांबून भारताच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. यावेळी टाळ्या, शिट्ट्या वाजून मुंबईकरांनी चांद्रयान मोहिमेचे स्वागत केले.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुंबईच्या अंधेरी स्थानकात एका भल्या मोठ्या एलएडी स्क्रीनसमोर उभे राहून शेकडोच्या मुंबईकरांनी याची देही याची डोळा हा ऐतिहासिक क्षण पाहिला. यावेळी कामावरून घरी जाण्यासाठी निघालेले अनेक मुंबईकर या कौतुकास्पद कामगिरीचा जल्लोष साजरा करताना दिसले, हा जल्लोष इस्रोमधील वैज्ञानिकांचं अभिनंदन करणारा होता. यावेळी स्टेशन परिसर वंदे मातरम, भारत माता की जय, हिंदुस्थान झिंदाबाद, गणपती बाप्पा मोरया न मातरमच्या गनभेदी घोषणा देण्यात आल्या. यासह टाळ्या, शिट्ट्या वाजवत संपूर्ण अंधेरी स्टेशन परिसर दणाणून सोडला. तर अनेकजण हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करताना दिले. कामावर अनेक लोक, शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी यांनी हा स्टेशन परिसर गर्दीने भरला होता. यातील प्रत्येक जण भारावून गेलेला दिसला. पण या उपस्थितांचा जल्लोष त्यांचा उत्साह पाहताना अंगावर शहारे येतील
चांद्रयान- ३ च्या यशासाठी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी अपार कष्ट घेतले. अत्यंत कमी खर्चात नियोजनबद्ध पद्धतीनं ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेच्या यशानंतर मुंबईतच नाही तर भारताच्या कोनाकोपऱ्यात य ऐतिहासिक कामगिरीचे सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी जगभरातील अनेक देशांनी देखील भारतावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.