भारताची अंतराळ संस्था इस्रोने चांद्रयान-३ च्या माध्यमातून चंद्रावर यशस्वी लँडिंग करुन एक नवा इतिहास रचला आहे. यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. इस्रोला दुसऱ्या प्रयत्नात चांद्रयानचे लँडिंग करण्यात यश मिळाले आहे. यापूर्वी हार्ड लँडिंगमुळे चांद्रयान २ यशस्वी होऊ शकले नाही. मात्र इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कठोर मेहनतीच्या जोरावर अखेर चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाली आहे. चांद्रयान-३ चंद्रावर सुखरुप उतरण्याची घोषणा होताच भारतीयांच्या आनंदाला पारा उरला नाही. यावेळी भारतीयांना राष्ट्रपती, पंतप्रधान, सीजेआय यांच्यासह अनेकांनी देशवासीयांचे आणि इस्रोचे अभिनंदन केले आहे. तसेच सोशल मीडियावरही चांद्रयान-३ च्या यशस्वीचे कौतुक करणारे अनेक व्हिडीओ, फोटो आणि मीस्म शेअर केले. सोशल मीडियावरील या फोटो आणि मीन्समध्ये अनेकांनी भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा एक सुंदर फोटो केला आहे. हा फोटो आता चर्चेचा विषय ठरत आहे.
युजर्सनी इस्रोशी निगडित शास्त्रज्ञांची काढली आठवण
अनेक देशवासीय एकीकडे आनंद व्यक्त करत आहेत, तर काही लोकांनी इस्रोच्या आतापर्यंतच्या प्रवासात सहभागी झालेल्या शास्त्रज्ञांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यात माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम, विक्रम सारा भाई, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह सर्व थोर व्यक्तींचे स्मरण केले जात असून त्यांच्या प्रयत्नांचेही कौतुक केले जात आहे.
माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचा तो फोटो होतोय व्हायरल
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा AI जनरेट केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच ते देशवासियांना आशीर्वाद देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगवर डॉ. कलाम यांची आठवण करून त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे लोक म्हणत आहेत.
दुसरीकडे, काँग्रेसकडून एकापाठोपाठ एक असे अनेक ट्विट करण्यात आले आहेत, ज्यात इस्रोच्या प्रवासात सहभाग झालेल्या महान व्यक्तींचा उल्लेख करण्यात आला आहे. यात माजी पंतप्रधान पंडित नेहरू, विक्रम साराभाई, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. सोशल मीडियावरही लोक एकमेकांचे अभिनंदन करत इस्रो आणि इस्रोशी संबंधित व्यक्तींच्या आठवणींना उजाळा देत, त्याच्या कार्याला सलाम करत आहेत. त्याचवेळी मिशनच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्याशी फोनवर बोलून संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.