‘मला तीन- चार दिवसांची सुट्टी हवीये’ हे वाक्य जरा तुमच्या बॉससमोर बोलून दाखवा… ते असं काही तोंड करतील की जणू तुम्ही तुमच्या हक्काची नाही तर त्यांचीच सुट्टी मागत आहात. त्यांच्याकडे सुट्टी मागायला जाताना चार गोष्टी ऐकायच्या आहेत हा विचार करुन तुम्ही मनाची तयारीही करता. तुमचे वरिष्ठही तुमची ही तयारी वाया जाऊ न देता ‘तुम्ही कामावर आला नाहीत तर काम कोण करणार?…’, ‘सगळ्यांना सुट्टी दिली तर कंपनी बंद करण्याची वेळ येईल…’ अशी एक ना अनेक कारणे पुढे करत तुमच्या रजेच्या अर्जाची पाठवणी नेहमीप्रमाणे केराच्या टोपलीत करतात. हे असे अनुभव किमान आपल्या भारतीयांना काही नवे नाहीत. पण आपल्या कर्मचाऱ्याला सुट्टी मिळावी, त्याने आपल्या कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाला म्हणून कोणी आपलं हॉटेल आठवडाभरासाठी बंद ठेवलेलं कधी ऐकलंय का?
वाचा : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, पण पैसे खर्च करण्यात काटकसरी
मग हे वाचा, आपल्या हेड शेफला सुट्टी मिळावी आणि त्याने कुटुंबासोबत वेळ घालवावा यासाठी ‘शेफ्स चॉइस नूडल बार’ने आठवडाभर आपलं हॉटेल बंद ठेवलं आहे. तशी सूचनाच त्यांनी हॉटेलबाहेर लावली आहे. इथे काम करणारे हेड शेफ मूळचे थायलंडचे आहे. कामामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांना आपल्या कुटुंबियांना भेटता आलं नाही. त्यांनी कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवावा यासाठी हॉटेल मॅनेजमेंटने त्यांना दोन आठवड्याची सुट्टी दिली आहे. दरवर्षी त्यांना दोन आठवड्याची सुट्टी देण्यात येते. याकाळत हॉटेल पूर्णपणे बंद ठेवण्यात येते. ४ ऑक्टोबरपासून हे हॉटेल पुन्हा सुरू होणार आहे. या हॉटेलने दरवाज्याबाहेर लावलेली पाटी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.