मिचॉन्ग चक्रीवादळाने दक्षिण भारतातील चेन्नई, तमिळनाडू, आंध्र प्रदेशात थैमान घातले आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसाने येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक शहरांत रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण चेन्नईतील पुराच्या पाण्यातही एक कार सहजपणे धावत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो आता महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर शेअर केला आहे. आनंद महिंद्रा यांनी यातून एसयूव्हीचे ऑफरोडिंग स्किल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
चेन्नईतील पूरस्थितीचे भीषण रूप दाखवणारा हा व्हिडीओ आहे; ज्यात रस्त्यावर पुराचे पाणी साठले असून, त्यातून ‘महिंद्रा थार’ जात असल्याचे दिसत आहे. परिस्थिती अशी आहे की, एसयूव्हीच्या बोनेटपर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे; पण हे वाहन न थांबता, पाण्यातूनही वाट काढत न थांबता सहज निघून जात आहे.
हा व्हिडीओ पोस्ट करीत आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, चेन्नईतील एक इन्स्टाग्राम पोस्ट; जी मला फॉरवर्ड करण्यात आली. एका उभयचर प्राण्याचे दृश्य….!
उभयचर प्राणी हे जमिनीवर आणि पाण्यात सहजपणे फिरू शकतात. त्याचप्रमाणे ही ‘थार’ असल्याचे आनंद महिंद्रा यांना म्हणायचे आहे. कारण- ‘थार’ ज्याप्रमाणे रस्त्यावर वेगाने धावत त्याचप्रमाणे पुराच्या पाण्यातही ती वेगाने जाताना दिसतेय. ‘थार’ची विलक्षण क्षमता कोणापासूनही लपलेली नाही आणि ही एसयूव्ही अनेक शतकांपासून त्याच्या सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. ती उत्कृष्ट ऑफ रोडिंग क्षमतेसाठीही खूप प्रसिद्ध आहे.
महिंद्रा थारची वॉटर वेडिंग क्षमता ६५० मिमी आहे; जी त्याच्या जवळच्या प्रतिस्पर्धी मारुती जिमनीपेक्षा दुप्पट आहे. मारुती जिमनीची वॉटर वेडिंग क्षमता फक्त ३०० मिमी आहे.
सामान्य भाषेत सांगायचे झाल्यास, वॉटर वेडिंग क्षमता म्हणजे कोणत्याही वाहनाची पाण्यात बुडण्याची क्षमता म्हणजेच वाहनाचे पुढचे बोनेट किती प्रमाणात पाण्यात बुडले जाऊ शकते, ते मिमीमध्ये मोजले जाते.