‘आम्ही रस्त्यावर राहायचो. डोक्यावर छप्पर नव्हते. पाऊस आला की आम्ही सुरक्षित ठिकाणी धाव घ्यायचो. मग पोलिसवाला यायचा आणि आम्हाला हाकलवून द्यायचा त्यानंतर भरपावसात पुन्हा एकदा डोक लपवण्यासाठी सुरक्षित जागेचा शोध सुरू व्हायचा’ ही काहाणी आहे एका रस्त्यावर राहणा-या तरूणाची. पण आज त्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आहे. या तरूणाला इटलीच्या एका विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे आणि लवकरच उच्च शिक्षण घेण्यासाठी तो इटलीत जाणार आहे.
ही यशोगाथा आहे ती जयावेल या २२ वर्षांच्या तरुणाची. चेन्नईतल्या पदरस्ता हेच त्याचे घर होते. मोठ्या शहरात पोट भरण्यासाठी आलेल्या पण हाती काहीच न लागलेल्या इतर गरिबांसारखेच त्याचे आयुष्य होते. मुळचा आंध्रप्रदेशमधल्या नेल्लोरचा असणा-या जयावेलच्या कुटुंबियांची शेती गेली आणि पोटाची खळगी भरण्यासाठी हे कुटुंब चेन्नईमध्ये आले. पण इथेही हाती काहिच लागले नाही, शेवटी कुटुंबियांना रस्त्यावर झोपून दिवस काढावे लागले. कुटुंबापुढे पोटापाण्याचा प्रश्न होता त्यामुळे जयावेलदेखील इतर भिका-यांसारखा रस्त्यावर भिक मागायचा. भिक मागून जे पैसे किंवा खायला मिळायचे त्यातून इतरांची भूक भागयाची. त्यातच वडिलांचे छत्रही हरवल्याने आईची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली.
ना घर, ना छप्पर, ना उत्पन्नाचे साधन त्यामुळे जयावेल भिक मागून दिवस काढत होता पण आयुष्याला कलाटणी देणारा एक प्रसंग घडला आणि त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले. याच काळात सुयम ट्रस्टच्या उमा मुथ्थुरामन आणि त्यांचे पती हे चेन्नईतील रस्त्यावर राहणा-या मुलांचे पुर्नवसन करण्यासाठी धडपडत होते त्यावेळी त्यांनी जयावेलला पाहिले. पुढे त्याच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी घेतली. जयावलेने या संधीचे सोने केले केंब्रिज विद्यापीठाच्या पूर्वपरिक्षेत तो यशस्वी झाला. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी तो आता इटलीला जाणार आहे.

Story img Loader