हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४६वा शिवराज्याभिषेक दिन असल्याने आज संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण आहे. महाराष्ट्रातील आणि देशभरातील प्रत्येक शिवभक्ताची इच्छा असते की यादिवशी आपण रायगडावर जाऊन याची देही याची डोळा सोहळ्यात सहभागी व्हावं. पण दैनंदिन आयुष्यात ऑफिस आणि घर ही कसरत करण्यातच वेळ जात असल्याने अनेकांना ते शक्य होत नाही. पण इच्छा असेल तर आपण आहोत तिथेही हा दिवस साजरा करता येऊ शकतो. लोकलमध्ये पोवाडा गात एका तरुणाने याची प्रचिती दिली आहे. लोकलमध्ये पोवाडा गातानाचा तरुणाचा हा व्हिडीओ फेसबुकवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून तरुणावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अविनाश आंब्रे असं या तरुणाचं नाव असून तो डोंबिवलीचा रहिवासी आहे. सकाळी कल्याणहून सुटणाऱ्या ७.१८ च्या लोकलने प्रवास करत असताना अविनाश आंब्रे याने हा पोवाडा गायला. यावेळी त्याच्यासोबत असणारे इतर प्रवासीही सहभागी झाले होते. हा व्हिडीओ इतका व्हायरल होईल याची कल्पनाही अविनाशला नव्हती. व्हिडीओ व्हायरल झालेला पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसल्याची प्रतिक्रिया त्याने दिली आहे. विशेष म्हणजे अविनशचं पोवाडा गायचं ठरलं नव्हतं. शिवराज्याभिषेक सोहळा असल्याने इतर प्रवाशांनी पोवाडा गाण्याची विनंती केली आणि मी गाण्यास सुरुवात केली अशी माहिती अविनाशने लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली.
अविनाश सांगतो की, ‘लोकलमध्ये आमचा ग्रुप असून आम्ही नेहमी भजन गातो. आम्ही गेल्या बऱ्याच वर्षांपासून गात आहोत. आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे असा आमचा नेहमी प्रयत्न असतो. अनेक प्रवासी आमचं भजन ऐकण्यासाठी येत असतात. आम्ही तुकाराम महाराजांचे अभंग किंवा एखादा सण, उत्सव असेल त्याप्रमाणे गात असतो’. लोकांचे व़्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत, पण आपला व्हिडीओ व्हायरल होईल असं कधी वाटलं नव्हतं असंही अविनाशने सांगितलं आहे.
हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट करताना अविनाशने स्पष्ट केलं आहे की, हा मूळ पोवाडा आमचे आदरणीय श्री.संजय पवार यांच्या मुखातून ऎकलेला.. गायकी माझी असली तरी शब्द त्यांचेच आहेत.