थंडीत कोणी आपल्याला गरमागरम चहाचा कप दिला तर? या चहावरच जगण्याचा तुम्ही विचार करु शकाल? बहुदा नाही. कारण चहाची तल्लफ असली तरी केवळ चहा पिऊन आपण राहू शकणार नाही. पण ही गोष्ट ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. याचे कारण म्हणजे छत्तीसगडमधील एक महिला केवळ चहावर जगत आहे. तेही एक दोन नव्हे तर तब्बल ३० वर्ष ही महिला केवळ चहा पिऊन जिवंत आहे असा दावा तिने केला आहे. बराडिया गावातील कोरिया जिल्ह्यात पिल्ली देवी या महिलेने ११ व्या वर्षी अन्न सोडले. तेव्हापासून ती केवळ चहा पिऊन जगत आहे. तिच्या या जीवनशैलीमुळे तिला गावात चायवाली चाची म्हणून ओळखले जाते.
तिचे वडिल रती राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ४४ वर्षांची असलेली पिल्ली सहावीत असताना तिने अन्न सोडले आहे. सहावीत असताना शाळेतर्फे ती जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी जनकपूर येथे गेली होती. तिथून परतल्यापासून तिने अन्न आणि पाणी सोडले. सुरुवातीला ती दुधाचा चहा प्यायची आणि त्यासोबत बिस्कीट आणि ब्रेड खायची असेही त्यांनी सांगितले. मात्र नंतर ती ब्लॅक टी कडे वळाली. तिला आरोग्याची कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी तिला डॉक्टरांकडेही नेण्यात आल्याचे तिच्या भावाने सांगितले. मात्र डॉक्टरांना तिच्या त्यांना कोणतीही समस्या आढळली नाही.
तिच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, ”ती क्वचितच घरातून बाहेर पडते. अन्यथा दिवसभर घरात शंकराची भक्ती करण्यात मग्न असते.” अशाप्रकारे केवळ चहावर इतके वर्ष जगणे कसे शक्य आहे असे मत या गावातील एका डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. नवरात्रीत ९ दिवस उपवास केले तरीही आपल्याला थकवा आल्यासारखे वाटते मग इतके वर्ष चहावर जगणे कसे शक्य आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.