एखाद्या प्राण्याचे शीर छाटून टाकल्यास तो प्राणी किती काळ जिवंत राहू शकतो, असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुम्ही त्याला मूर्ख म्हणाल. कारण शीर छाटून टाकल्यानंतर कोणताही प्राणी जिवंत राहू शकत नाही. मात्र कोलोरॅडोमध्ये जर तुम्ही हाच प्रश्न एखाद्या व्यक्तीला विचारला तर ती व्यक्ती त्या प्रश्नाचे उत्तर १८ महिने असे देईल. कारण कोलोरॅडोतील लोकांनी एका कोंबडीच्या पिल्लाला १८ महिने शीर नसतानाही जगताना पाहिले आहे.
७० वर्षांपूर्वी कोलोरॅडोतील एक शेतकरी आणि त्याची पत्नी त्यांच्या शेताची सफाई करत होते. यावेळी कोंबडे, कोंबड्या आणि त्यांच्या पिल्लांचादेखील सफाया करण्यात आला. या शेतकरी दाम्पत्याने माईक नावाच्या कोंबडीच्या पिल्लावरही सुरा फिरवला. मात्र यानंतर जे काही झाले, त्याने या दोघानांही धक्का बसला. कारण माईकच्या मानेवर सुरा फिरवूनही तो जिवंत होता.
मुंडके धडापासून वेगळे करण्यात आल्यानंतरही माईक थोडेथोडके नव्हे, तर तब्बल १८ महिने जिवंत राहिला. या १८ महिन्यांच्या काळात माईकला मोठी प्रसिद्धी मिळाली. माईकचे वर्णन त्यावेळी मिरॅकल माईक म्हणून करण्यात आले. मुंडके नसूनही माईक इतर पिल्लांप्रमाणेच जीवन जगत होता. माईकला पाहून त्यावेळी अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. शीर धडावेगळे होऊनही माईक जिवंत कसा, हा प्रश्न अनेकांना पडला.
अखेर १८ महिन्यानंतर माईकचा मृत्यू झाला. यानंतर माईकचे शवविच्छेदन झाल्यावर रहस्यावरील पडदा हटला. माईकचे शीर धडावेगळे करताना त्याच्या गळ्याची नस कापली गेली नव्हती. त्यामुळे माईकच्या गळ्याच्या भागातून कोणताही रक्तस्राव झाला नाही आणि त्यामुळेच शीर कापले गेल्यानंतरही माईक १८ महिने जिवंत होता, ही माहिती समोर आली. कोलोरॅडोतील एस्पेन रस्त्यावर माईकचा पुतळादेखील उभारण्यात आला आहे.