मध्य प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसमोर अनेक आव्हानं होती. इव्हीएमसोबत छेडछाड केली जात असल्याचा आरोप होत असताना सुरु असणाऱ्या गोंधळात मतमोजणी सुरु होती. मंगळवारी मतमोजणीला सुरुवात होऊनही रात्रीपर्यंत निकाल स्पष्ट नव्हता. अखेर बुधवारी सकाळी अंतिम निकाल हाती आला. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी या सर्व आव्हानांना यशस्वीपणे पेललं. मात्र त्यांच्यासमोर हे एकमेक आव्हान नव्हतं. त्यांच्या खासगी आयुष्यात यापेक्षाही मोठं वादळ आलं होतं.
7 डिसेंबरला निकालासाठी फक्त चार दिवस बाकी असताना मुख्य निवडणूक अधिकारी व्ही एल कांथा राव यांना त्यांचे 80 वर्षीय वडील सुर्यनारायण यांचं हैदराबादमध्ये निधन झालं असल्याची माहिती मिळाली. पुढील अर्ध्या तासात 1992 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असणारे राव हैदराबादला जाण्यासाठी निघाले होते. विमानाने त्यांनी हैदराबाद गाठलं.
संध्याकाळी आपल्या वडिलांचा मृतदेह घेऊन राव आंध्र प्रदेशातील आपल्या गावी निघाले होते. हे जवळपास 450 किमी अंतर होतं. अंत्यविधी पार पडल्यानंतर कांथा राव लगेचच भोपाळसाठी रवाना झाले. 9 डिसेंबरच्या रात्री ते थेट निवडणुकीच्या कामासाठी पोहोचले. काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरु असलेल्या चुरशीच्या लढतीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. मात्र अखेर काँग्रेस भाजपापेक्षा जास्त जागा मिळवत मोठा पक्ष ठरला.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना राव यांनी सांगितलं की, ’28 नोव्हेंबरला जेव्हा मतदान संपलं तेव्हा आम्हाला आम्ही खूप चांगली कामगिरी केली असं वाटत होतं. मात्र त्यानंतर खऱ्य़ा अर्थाने आमच्या समस्या सुरु झाल्या’. राव इव्हीएमसोबत छेडछाड तसंच होणाऱ्या इतर आरोपांसंबंधी बोलत होते.
‘ते फक्त राजकारण्यांनी केलेले आरोप होते. निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केला म्हणून अधिकाऱ्यांना काढून टाकणं सोपं आहे. पण त्या जाणुनबुजून केलेल्या नव्हत्या. आम्हाला अधिकाऱ्यांची बाजू घेणं गरजेतं होतं. यासाठी खूप पेपरवर्क करावं लागत होतं’, अशी माहिती राव यांनी दिली आहे.
राव याआधी स्पोर्ट्स आणि युवा कल्याण विभागाचे मुख्य सचिव होते. जुलै महिन्यात त्यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती झाल्यानंतर एकाच महिन्यात त्यांचं नाव चर्चेत आलं होतं. निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे त्यांनी निवडणूक कामात सहभागी होणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांची लेखी परीक्षा घेतली होती. सहभागी झालेल्या 567 अधिकाऱ्यांपैकी फक्त 244 जणांना 70 हून जास्त टक्के मिळाले होते.