देव तारी त्याला कोण मारी? असं म्हटलं जातं, याचेच एक ताजे उदाहरण गाझामधून समोर आले आहे. जिथे ३७ दिवसांपासून ढिगाऱ्याखाली दबलेला एक निष्पाप चिमुकला सुखरुप सापडला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक भावूक झाले आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धविरामदरम्यान हा व्हिडिओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान ढिगाऱ्याखाली लहान मुल सापडले आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले करून अनेक इमारती आणि रुग्णालये जमीनदोस्त केली. इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये हजारो लोक मारले गेले. सर्वत्र मृतदेहांचे ढीग पडले होते. रुग्णालयांमध्ये मृतदेह ठेवण्यासाठीही जागा नव्हती, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
वृत्तानुसार, गाझामधील युद्धविराम दरम्यान सुरक्षा दल इमारतींखाली दबलेले मृतदेह बाहेर काढत असताना एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. यानंतर सुमारे ३ तासांच्या अथक परिश्रमानंतर जवानांनी ढिगारा हटवला तेव्हा लहान मूल एका मोठ्या दगडाखाली सुखरूप पडलेले दिसले. हा चिमुकला सुखरूप असल्याचे पाहून बचाव कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. तो जिवंत असल्याचं पाहताच सर्वांना खूप आनंद झाला तर काहीजण भावूक देखील झाले. याच घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
३७ दिवसांपासून ढिगाऱ्याखाली अडकला होता चिमुकला –
व्हायरल व्हिडीओमध्ये लहान मुलाला सुखरुप असल्याचं पाहून लोक भावूक झाल्याचं दिसत आहे. प्रत्येकजण देवाचे आभार मानत आहे. शिवाय ३७ दिवसांनतंरही हा मुलगा जिवंत पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिवाय हा दैवी चमत्कार असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत.