माणूस आणि प्राणी यांचे खूप जवळचे नाते आहे. जर लहानपणापासून तुम्ही एखाद्या प्राण्याला जीव लावला, त्याची काळजी घेतली, तर तो तुमचा चांगला मित्र बनू शकतो. कुत्रा असो, मांजर असो वा ससा, हे प्राणी माणसांमध्ये इतके चांगल्या प्रकारे मिसळतात की ते पाहून आश्चर्य वाटते. पण, धोकादायक प्राण्यांना ही गोष्ट लागू होत नाही. यात मगरीचे नाव जरी काढले तरी भल्याभल्यांना भीती वाटते. कारण मगर एका झटक्यात माणसावर जीवघेणा हल्ला करू शकते. पण म्हणतात ना, प्राणी कितीही धोकादायक असला तरी तुम्ही त्याला जीव लावला तर तो तुम्हालाही तितक्याच प्रेमाने आपलंस करतो. तसाच काहीसा प्रकार आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा चक्क शेकडो मगरींच्या पिल्लांच्या घोळक्यात मस्त आरामात पोहताना दिसत आहे. मगरीची पिल्लंही अगदी शांतपणे त्या मुलाच्या अंगावर जाऊन बसतात. हे पाहताना आपल्याला भीती वाटते, मात्र तो मुलगा अगदी आनंदात त्यांच्यासोबत खेळत आहे.
तुम्ही व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक लहान मुलगा एका पुलामध्ये उडी मारतो. पण, हा पूल सामान्य नव्हता; कारण त्यात शेकडो मगरींची पिल्लं एकत्र पोहत होती. त्यामुळे पूल पाहतानाही खूप भीतीदायक वाटतो. ही पिल्लं आकाराने जरी लहान असली तरी शेवटी मगरीची जात, केव्हाही हल्ला करू शकते. पण कसलीही भीती न बाळगता तो मुलगा अगदी आनंदात त्या पिल्लांसह पोहताना दिसतोय. मुलाने जशी पाण्यात उडी मारली, तशी अनेक मगरींची पिल्लं एका बाजूने घोळका करून होती. तर एक पिल्लू त्याच्या अंगावर शांत जाऊन बसलेले दिसले. हा व्हिडीओ पाहताना तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून त्याला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एक युजरने लिहिले की, नशीब त्याचे आई-वडील तिथे नव्हते. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, हाच प्रकार पुन्हा दोन वर्षांनी करून दाखव आणि मग सांग. यावर अनेकांनी मुलाच्या धाडसाचे कौतुक केले, तर काहींनी हा मूर्खपणा असल्याचे म्हटले आहे.