Stray Dogs Attack Child : काही काळापासून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशा या भटक्या कुत्र्यांचा त्रास अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामुळे लोकांना एकट्याने घराबाहेर पडतानाही भीती वाटतेय. विशेषत: रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. भटक्या कुत्र्यांची टोळकी अनेकदा एकटी चालणारी महिला, लहान मुले आणि वृद्धांवर हल्ला करतात. एखादे लहान मूल जर चुकून त्यांच्या तावडीत सापडले, तर ते त्याला हल्ला करून, लचके तोडून ठार करतात. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मूल घरात खेळत असते. मधेच ते मूल खेळता खेळता, आईची नजर चुकवून रस्त्यावर येते. पण, ते एकटे मूल बघून, कुत्र्यांच्या टोळीने अचानक त्याच्यावर हल्ला केला. यावेळी त्या मुलाने पळण्याचा प्रयत्न केला; पण त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. त्या कुत्र्यांनी त्याला खाली पाडले आणि ओरबाडून काढले. इतकेच नाही, तर एका ठिकाणाहून दुसरीकडे त्याला फरपटत नेले. त्यांनी त्याचे डोके, हात, पाय असे मिळेल तिथे ते कुत्रे चावे घेत होते. एखाद्या खेळण्याप्रमाणे ते त्याला रस्त्यावर गरगर फिरवत राहिले. सुदैवाने बाजूच्या घरातून एक जण तिथे धावत आला आणि त्यांनी त्या मुलाचा जीव वाचवला. थोडा जरी उशीर झाला असता तरी त्या मुलाबरोबर मोठी दुर्घडना घडली असती. ही दुर्घटना तेलंगणातील संगारेड्डी येथील श्रीनगर कॉलनीत घडल्याचे समोर आले आहे.

मूर्खपणाचा कळस! रीलसाठी खवळलेल्या समुद्रात स्कुटी घेऊन गेला अन्…; पाहा VIDEO

या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये स्थानिक रहिवासी कुत्र्यांच्या तावडीतून मुलाला सोडविताना दिसत आहे. जखमी मुलाला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, या घटनेवरून पालकांनी आपल्या लहान मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी एकटे सोडू नये, असे आवाहन केले जात आहे.

हा धक्कादायक व्हिडीओ @shubhamrai80 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. दरम्यान,राज्यात भटक्या कुत्र्यांकडून लहान मुलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांची तेलंगणा उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी राज्य प्रशासनाच्या प्रयत्नांच्या परिणामकारकतेवर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. मुलांच्या जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त करीत न्यायालयाने महापालिका, महसूल आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालात भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि असे हल्ले रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा तपशील असावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

या दुर्घटनेने पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका अधोरेखित केला आहे. शासन व स्थानिक प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन प्रभावी पावले उचलणे गरजेचे आहे; जेणेकरून भविष्यात अशा संभाव्य दु:खद घटनांना आळा बसेल.