“बालपण देगा देवा!” असे म्हणतात ते उगाच नाही. किती सुंदर असतात ना ते दिवस. कसलीही चिंता नाही, कसलंही दडपण नाही…प्रत्येक क्षण आनंदाने आणि मुक्तपणे जगायचं, खेळायचं -बागडायचा…..नुसती धमाल आणि मस्ती करायची. बालपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की गावी जाऊ मित्र-मैत्रिणींबरोबर खेळण्याचा आनंद काही वेगळा असतो. पकडा-पकडी, विष-अमृत, डोंगर का पाणी, लंगडी, फरशी-पाणी, लपा-छपी, अप्पा-रप्पी, लगोर, दोरीच्या उड्या मारणे, खांब-खांब कित्येक खेळ खेळताना जी मज्जा यायची त्याची तोड कशालाच येत नाही. आपल्यापैकी बहुतांश लोकांनी बालपणी हे खेळ खेळले असतील. काही खेळांची नावे प्रदेशानुसार वेगळी असेल पण खेळाची मजा मात्र तीच असते. सोशल मीडियावर सध्या अशाच काही लहान मुलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या आठवणी देखील जाग्या होतील.
व्हायरल व्हिडीओमध्ये काही लहान मुले खांब-खांब हा खेळ खेळताना दिसत आहे. अत्यंत मजेशीर अशा खेळामध्ये खांब असलेल्या ठिकाणी मंदिरात, वाड्यामध्ये किंवा झाडाजवळ खेळता येतो. प्रत्येक खांबाजवळ अथवा झाडाजवळ एक खेळाडू थांबतो. हे खेळाडू आलटून पालटून खांब बदलतात. ज्या खेळाडूवर राज्य आहे त्याला खांब पकडण्याची ही संधी असते. दोन खेळाडू एकमेकांच्या खांबपर्यंत पोहचण्याआधी ज्या खेळाडूवर राज्य आहे त्याने हा खांब पकडला तर ज्या खेळाडूला खांब मिळणार नाही त्याच्यावर राज्या येते. काही ठिकाणी या खेळाला शिरापुरी असे म्हणतात. ज्या खेळाडूवर राज्या आहे तो प्रत्येक खांबाजवळ शिरापुरी मागतो…खांबासमोर थांबलेला खेळाडू त्याला पुढच्या घरी जाण्यास सांगतो असे करत खेळाडू प्रत्येक खांबाजवळी खेळाडूजवळ जातो. या दरम्यान इतर खेळाडू आपले खांब बदलतात. ज्या खेळाडूवर राज्य आहे त्याने जर चपळाईने खांब मिळवला तर आपले राज्य तो दुसऱ्यावर टाकू शकतो, तोपर्यंत त्याल्या प्रत्येक खेळाडूकडे जाऊन शिरापुरी मागावी लागते. हा खेळ अत्यंत मजेशीर आहे. तुम्ही जर हा खेळ कधीही खेळला नसेल तर एकदा नक्की खेळून पाहा, काहीक्षणासाठी लहान होऊन जगण्याचा आनंद तुम्हाला नक्की मिळेल.
इंस्टाग्रामवर amhi__mandangadkar नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी” व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. अनेकांच्या लहापणीच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. लोकांनी व्हिडीओवर कमेंट करून आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
एकाने कमेंटमध्ये लिहिले की, “लहानपणाची खूप आठवण येते.”
दुसऱ्याने सांगितले, “आम्ही या खेळाला खांब-खांब म्हणायचो”
तिसरा म्हणाला, “आम्ही या खेळाला शिरापुरी पुढच्या दारी असे म्हणयचो”
चौथा व्यक्तीने सांगितले की हो आम्ही हा खेळ खूप खेळलो आहे या खेळाला आम्ही चिलीम तंबाखू, घर बाजू असू बोलायचो”
पाचवा म्हणाला,” आम्ही तर शाळेत जाऊन हा खेळ खेळायचो”
“लहानपणीचे दिवस कधीच येणार नाही त फक्त आठवणी राहिल्या”