जंगल हे वन्य प्राण्यांचं नैसर्गिक अधिवास आहे. शिकार करणं आणि आपलं पोट भरणं हा जंगलातील प्राण्यांचा नियम आहे. यावरच जंगलातील जीवनचक्र सुरु असतं. शिकार करताना अनेकदा प्राणी जखमी होतो किंवा आपासांत लढताना जर वन्य प्राणी जखमी झाले तर जखम जिभेने साफ करतात. मात्र वन्यप्राणी या व्यतिरिक्तही आपल्या जखमेवर उपचार करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक चिंपांझी कीड्यामुंग्यांच्या मदतीने जखमेवर उपचार करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओत एक चिंपांझी आपल्या मुलाच्या पायावर झालेल्या जखमेवर कीडे लावताना दिसत आहे. ओजौगा चिंपांझी प्रोजेक्टच्या संशोधकांनी व्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या चिंपांझीचा शोध घेतला आहे.
ओजौगा चिंपांझी प्रोजेक्टच्या संशोधकांच्या मते, वयस्कर चिंपांझी सूजी आपल्या मुलाच्या जखमेचं पहिल्यांदा निरीक्षण करतो. यानंतर जखमेचा अंदाज घेतल्यानंतर त्यावर उपचारासाठी पहिल्यांदा एक कीटक पकडतो. त्यानंतर तो तोंडात टाकतो. काही वेळ चावल्यानंतर चिंपांझी आपल्या मुलाच्या जखमेवर लावतो. चिंपांझीच्या या कृतीने संशोधकांना आश्चर्याचा धक्का बसला असून यावर संशोधन सुरु केलं आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार चिंपांझीने कोणता कीटक जखमेवर वापरला याबाबतची माहिती नाही. या कीटकाच्या मदतीने जखम स्वच्छ किंवा दुखापत कमी करण्यास मदत होत असावी असा अंदाज आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. वन्य प्राण्यांचे उपचार पाहून नेटकरी आश्चर्यचकीत आहे.