China Jugaad Viral : हॉटेल रूम्समध्ये अनेकदा गुप्त कॅमेरे लपवले जातात, ज्यात रूममध्ये येणाऱ्या गेस्टचे अनेक खाजगी क्षण रेकॉर्ड केले जातात. अनेक हॉटेल्समधील अशा घटना वारंवार समोर येतात. नंतर हे व्हिडीओ विकले जातात किंवा सोशल मीडियावर शेअर केले जातात. यात खास करून महिलांना टार्गेट केले जाते. त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. मात्र, या अडचणीतून वाचण्यासाठी एका महिलेने भन्नाट जुगाड शोधून काढला आहे. या जुगाडाची आता सर्वत्र चांगलीच चर्चा रंगतेय.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनच्या लुयांग शहरात एक डँग नावाची महिला राहते. जिने अलीकडेच चीनच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये तिने हॉटेलमध्ये गेल्यावर तिथल्या रूममधील छुप्या कॅमेऱ्यांपासून वाचण्यासाठी एक भन्नाट जुगाड सांगितला आहे. तिने सांगितले की, काही दिवसांपूर्वी ती एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेली होती, त्यावेळी तिथल्या रूममध्ये छुपे कॅमेरे बसवल्याची भीती तिला सतत वाटत होती. त्यामुळे ही भीती कमी करण्यासाठी तिने रूममधील बेडवर चक्क एक टेंट तयार केला, म्हणजे बेडच्या चारही बाजूने डस्ट शीट लावली आणि त्यात ती झोपली.

महिलेने सांगितले की, तिने अनेकदा ऐकलं होत की हॉटेल रूममध्ये छुपे कॅमेरे बसवले जातात, ज्यामुळे तिला भीती वाटत होती. आधी तिने विचार केला की छुप्या कॅमेऱ्यांपासून वाचण्यासाठी हॉटेलमध्ये एक टेंट घेऊन जाईल, पण टेंटची किंमत जास्त असल्याने तिने तो विचार सोडला. टेंटच्या जागी तिने एक डस्ट शीट खरेदी केली, जी फर्निचरवर कोणत्याही प्रकारची धूळ बसू नये म्हणून वापरली जाते. ही डस्ट शीट बांधण्यासाठी तिने एक दोरही सोबत घेतला.
यावेळी तिने एका व्हिडीओत हॉटेल रूममध्ये टेंट कसा तयार करायचा याविषयीदेखील माहिती दिली आहे. डाँगने सांगितले की, रूममधील बेडच्या मधोमध एका उंच जागी दोरी बांधा आणि त्यावर चादर टाका, यानंतर चादरीचे कोपरे बेडच्या कोपऱ्यांमध्ये खोचून ठेवा. डाँगने १.७ मीटर उंच, २ मीटर लांब आणि २ मीटर रूंद असा टेंट बनवला होता. पण, डाँगने व्हिडीओत ती कुठल्या हॉटेलमध्ये थांबली होती, त्याचं नाव आणि पत्ता सांगितला नाही, तसेच त्या ठिकाणी कशासाठी गेली होती हेही सांगितले नाही.