Man inhales cockroach in sleep: कोणत्याही सजीव प्राण्यासाठी झोप अत्यंत महत्त्वाची असते. पुरेशी झोप घेतल्यामुळे शरीरातील थकवा निघून जातो, स्नायूंना आराम मिळतो. पण झोपलेलो असतानाही काही काळजी घेण्याची गरज आहे. अनेकांना झोपेत तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असते. तर काही लोक झोपेत जोरजोराने श्वास घेत असतात. चीनमधील एका ५८ वर्षीय इसमाबरोबर एक धक्कादायक प्रसंग घडला आहे. रात्री झोपेत श्वास घेत असताना या इसमाच्या नाकात अनवधानाने एक झुरळही आत नाकपुड्यात घुसले. तिथून ते आत आत जाऊ लागले. मात्र झोपेत असलेल्या व्यक्तीला याची सुगावाही लागली नाही. मात्र झोपेतून उठल्यानंतर श्वास घेताना अडचण येऊ लागल्यामुळे त्याने डॉक्टरकडून तपासणी करून घेतली आणि मग या धक्कादायक प्रसंगाचा उलगडा झाला.
पुढे काय घडले?
चीनमधील हेनान प्रांतात राहणाऱ्या हायको या व्यक्तीबरोबर हा प्रसंग घडला आहे. रात्री नाकात झुरळ गेल्यानंतर सकाळी हायकोला घशातून काहीतरी सरकत असल्याची जाणीव त्याला झाली. मात्र याकडे हायकोने दुर्लक्ष केले. मात्र तिसऱ्या दिवशी त्याच्या श्वासातून दुर्गंधी यायला लागली. तसेच खोकल्यासह पिवळा कफ बाहेर पडू लागला. मग त्याने डॉक्टरला दाखविण्याचा निर्णय घेतला. हायकोने हेनान येथील ईएनटी (नाक, कान, घसा) तज्ज्ञांकडे तपासणी करून घेतली. मात्र तपासणीत काहीही वेगळे आढळून आले नाही.
झुरळ आत गेल्याचा थांगपत्ता कसा लागला?
ईएनटीच्या डॉक्टरांनी फार गंभीर कारण सांगितले नसले तरी हायकोचा त्रास वाढत होता. म्हणून त्याने श्वसनाशी संबंधित विशेष तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्याचा निर्णय घेतला. त्या डॉक्टरांनी त्याच्या छातीचा सीटी स्कॅन काढला. तेव्हा त्याच्या छातीच्या उजव्या बाजूला काळसर डाग दिसून आला. यावरून शरीराबाहेरची काहीतरी वस्तू आता असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. डॉक्टरांनी हायकोला ब्राँकोस्कोपी करण्याचा सल्ला दिला. ब्राँकोस्कोपीच्या मदतीने श्वसनवाहिन्यांची तपासणी केली जाते.
हे ही वाचा >> Cobra bite Viral Video: नागाला तोंडात धरून रील बनविणे भारी पडले; व्हिडीओ संपताच आयुष्याचाही ‘दी एंड’
डॉक्टरांनी काय सांगितले?
सदर उपचार करणाऱ्या डॉ. लीन लिंग यांनी एका वृत्त संकेतस्थळाला प्रतिक्रिया देताना सांगितले की, दुसऱ्या दिवशी हायकोची शस्त्रक्रिया करत असताना आम्हाला त्याच्या श्वसन नलिकेत पंखासारखी एक बाब आढळून आली. जेव्हा श्वसन नलिकेत जमलेला कफ बाहेर काढला तेव्हा सीटी स्कॅनमध्ये दिसलेली ती बाब बाहेर आली आणि आम्हाला धक्काच बसला. हायकोच्या श्वसन नलिकेतून एक झुरळ बाहेर काढण्यात आला होता.
तसेच ज्याठिकाणी झुरळ अडकला होता, त्याठिकाणची स्वच्छता करण्यात आली. ऑपरेशननंतर हायकोला आराम लाभला आहे. श्वसनातून येणारी दुर्गंधी आणि पिवळा कफ बाहेर पडणे, आता बंद झाले आहे, असेही डॉक्टर लिंग यांनी सांगितले.