China Viral House: सामान्य माणूस त्याच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी आयुष्यभर मेहनत घेत असतो, त्यामुळे त्याचं घराशी एक भावनिक नातं जोडलेलं असतं. घरातील प्रत्येक व्यक्तीप्रमाणे तिथल्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचं प्रेम असतं, आठवणी असतात; त्यामुळे असं घर सोडणं त्यांच्यासाठी सोपे नसतं. सध्या अशीच एक घटना चीनमधून समोर आली आहे, जिथे सरकारने एका जमीनदाराचे त्याचे राहते घर सोडण्यासाठी त्याला तब्बल एक कोटी ९० लाख रुपयांची ऑफर देण्यात आली, कारण ते घर तोडून सरकारला तिथून महामार्ग बांधायचा होता. यासाठी इतर लोकांनी आपली जमीन दिली, मात्र त्या व्यक्तीने घरासाठी कोट्यावधींची ऑफर धुडकावत आपल्या निर्णायावर ठाम राहिला, परिणामी सरकारला महामार्गाची रचना बदलून त्याच्या घराभोवतीने हायवे बांधावा लागला.
नाकारली कोट्यावधींची ऑफर
चीनच्या हुआंग पिंग नावाच्या या व्यक्तीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. कारण हीच व्यक्ती आहे, जिने सरकारने कोट्यावधींची ऑफर देऊनही राहते घर देण्यास नकार दिला. ही व्यक्ती चीनमधील शांघायच्या दक्षिण – पश्चिम मार्गावरील जिन्सी नावाच्या एका गावातील एका बांधकामाधीन महामार्गाच्या मध्यभागी राहते. सामान्यतः जेव्हा एखादा रस्ता किंवा महामार्ग बांधला जातो तेव्हा सरकार तेथील लोकांच्या सर्व जमिनी आणि घरे खरेदी करते. चीनमध्ये जिन्सी नावाच्या गावात महामार्ग बनवायचा होता, त्यासाठी सरकारने हुआंग पिंगला कोट्यावधी रुपयांची ऑफरही दिली होती. पण, पिंगने आपले घर न सोडण्याचा निर्णय घेत सरकारची ऑफर नाकारली. व्हायरल झालेल्या दाव्यात असे बोलले जात आहे की, या व्यक्तीला आपले घर त्याहून अधिक पैशांत विकायचे होते.
सरकारी प्रकल्पासाठी आपले घर विकण्यास नकार देणाऱ्या त्या वृद्ध चिनी व्यक्तीला आता आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे. हुनान प्रांतातील हुआंग पिंग यांना सरकारकडून अधिक पैशांची अपेक्षा होती, पण आता जे मिळत होते तेही त्याने गमावले, कारण सरकारने आता त्यांच्या घराभोवतीने महामार्ग बांधला. त्यामुळे त्यांचे हे घर रस्त्याच्या मधोमध एकटं उभं आहे. गाड्यांच्या आवाजामुळे या व्यक्तीला आता त्या घरात झोप लागत नाही. हुआंग त्याची पत्नी आणि नातवाबरोबर राहतात. घरातून बाहेर पडण्यासाठी त्यांना बोगद्यातून जावे लागते. मात्र, लोक त्याचे हे घरी पाहण्यासाठी येत असल्याने त्याने यातून पैसा कमावण्याचा विचार केला आहे.