परग्रहावरील माणसे म्हणजे एलियन्स यांच्याबद्दल किती कुतूहल प्रत्येकाच्या मनात आहे, आतापर्यंत या परग्रहावरील माणसांबद्दल किती कथा आपण ऐकल्या असतील. आजही परग्रहावरील माणसे म्हणजे एलियन्स अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग आहे. गेल्या काही काळात त्यांना पाहिले गेल्याचे दावेही अनेकांनी केले आहे. इंटरनेटवर तर अशी कितीतरी माहिती उपलब्ध आहे. या कुतूहलापोटी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न यापूर्वीही झाला आहे आता पुन्हा एकदा परग्रहावरील माणसांचा शोध घेण्याचा प्रयत्न होणार आहे.
चीनमध्ये एलियन्सचे अस्तित्त्व शोधण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून एक मोहीम आखली जात आहे. चीनने या एलियन्सचा शोध घेण्यासाठी रेडिओ टेलिस्कोप तयार केला आहे. चीनमधल्या गुईज़ौ प्रातांत हा मोठा रेडिओ टेलिस्कोप उभारण्यात आला आहे. १, ६४० व्यासाचा हा टेलिस्कोप आहे. इतका प्रचंड आकार असलेल्या या दुर्बिणीची क्षमता अधिक आहे त्यामुळे हिचा वापर करून अवकाशातील ग्रहावर असलेल्या एलियन्सचा शोध घेण्यात येईल असा दावा चीनने केला आहे. याच आठवड्यात २५ सप्टेंबरला ही मोहिम सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले आहे. चीनची ही महत्त्वाकांक्षी मोहिम एलियन्सच्या शोधासाठी चर्चेत असली तरी ती वादात देखील सापडली आहे. या मोहिमेच्या उभारणीसाठी गुईज़ौ प्रांतातील जवळपास ९ हजारांहून अधिक लोकांना विस्थापित केले आहे.