जगात अनेकदा अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, ज्या पाहून अनेकदा आश्चर्यचकित व्हायला होते. सध्या अशीच एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक भली मोठी इमारत दिसतेय. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर चक्क एक पेट्रोल पंप बांधण्यात आले आहे, जे पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. या इमारतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा पेट्रोल पंप चीनच्या चोंगाकिंगमध्ये बांधण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पेट्रोल पंपावर काही वाहनांमध्ये पेट्रोल भरले जात आहे. पण, ही वाहनं या पेट्रोल पंपापर्यंत पोहोचली कशी, असा प्रश्न युजर्सना पडला आहे. प्रत्यक्षात ही इमारत अगदी खालच्या बाजूला बांधली आहे. संपूर्ण डोंगराळ भाग असल्याने ही इमारत डोंगरातून जाणाऱ्या दोन रस्त्यांच्या कनेक्टमध्ये येईल अशा पद्धतीने इमारतीचे बांधकाम केले आहे. नीट पाहिल्यास या इमारतीच्या मागच्या बाजूने म्हणजे एक रस्ता जात आहे, जो या इमारतीच्या पाचव्या मजल्याच्या अगदी बरोबरीला आहे. तर इमारती समोरच्या बाजूनेही एक रस्ता जातो. इथे उभे राहिल्यावर इमारतीचे खालून वर असे पाच मजले दिसतात.

इमारत बांधकामाचा अप्रतिम नमुना

चीनमध्ये बनवलेला हा पेट्रोलपंप बांधकाम शैलीचे अप्रतिम उदाहरण आहे. पण, असे अनेक जुगाड चीनमध्ये अनेकदा पाहायला मिळतात. उदाहरणार्थ, ही इमारत पाहिली तर असे वाटते की, पाचव्या मजल्यावर पेट्रोल पंप उघडण्याची काय गरज होती? पण, पलीकडचा रस्ता बघितला की, ही इमारत किती विचारपूर्वक बांधली असेल हे समजतं. कारण या रस्त्यावरून जाणारी वाहने सहज पेट्रोल भरू शकतात. त्यामुळे अगदी दोन प्रकारे ही इमारत वापरली जात आहे.

हा व्हिडीओ @TansuYegen नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, जो आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे; तर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. पण, या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर एखादी व्यक्ती पेट्रोल भरण्यासाठी जाणार कशी? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.