माणुसकीचीही सारी हद्द ओलांडणारी क्रूर घटना चीनच्या प्राणीसंग्रहालयात पाहायला मिळाली. ही घटना ज्यांनी याची देही याची डोळा पाहिली त्यांना या घटनेने जबरदस्त धक्का बसला. चीनमधल्या Changzhou zoo संग्रहालयातील कर्मचारी वाघांचं पोट भरण्यासाठी जिवंत गाढवांना अक्षरश: पिंजऱ्यात ढकलून देत होते. जीव वाचवण्यासाठी गाढव जीवाच्या आकांताने ओरडत होते, पण जमलेल्या पर्यटकांचं मनोरंजन करण्यासाठी कर्मचारी काही फुटांवरून गाढवाला जबरदस्तीने पिंजऱ्यात ढकलून देत होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात संग्रहालयावर टीका होत आहे.

या संग्रहालयात वाघांसाठी खास पिंजरा तयार करण्यात आला आहे. या पिंजऱ्यात वाघांना जंगलासारखे वाटावे यासाठी तळंही बनवण्यात आले आहे. तर वरून या पिंजऱ्याला जाळी लावण्यात आलीये. पर्यटक कठड्यावर उभे राहून या वाघांचे दर्शन घेतात. पण त्यादिवशी मात्र संग्रहालयातल्या कर्मचाऱ्यांनी क्रुरतेची सारी हद्द ओलांडली. त्यांनी फरपटत एका गाढवाला आणलं आणि उंचावरून पिंजऱ्यात ढकलून दिलं. आपला जीव वाचवण्यासाठी गाढव धडपडत होते पण वाघांनी काही मिनिटांतच सगळ्यांच्या डोळ्यादेखत त्याचा फडशा पाडला. हे पाहून इथे उपस्थित असलेल्या पर्यटकांना जबरदस्त धक्का बसला.

Story img Loader