Chinese Colleges Are Giving Weeklong Love Break to Students : शाळा आणि कॉलेजेसना सणांव्यतिरिक्त हिवाळा आणि उन्हाळ्यात सुट्ट्या असतात. प्रत्येक देशात शाळा, कॉलेजसाठी सुट्ट्यांचा फॉरमॅट थोडा वेगळा असू शकतो. पण तुम्ही कधी प्रेम किंवा रोमान्स करण्यासाठी देशभरातील कॉलेजेसनी विद्यार्थ्यांना सुट्टी दिली आहे असं कधी ऐकलं आहे का? नाही ना.. हे ऐकायला थोडं वेगळं वाटेल. कारण भारतात शाळा, कॉलेज म्हणजे विद्यार्थ्यांचे भवितव्य असते असे मानले जाते. पण चीनमध्ये देशाचे भवितव्य टिकून ठेवण्यासाठी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

एनबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमधील काही कॉलेजेसनी प्रेम आणि रोमान्स करण्यासाठी विद्यार्थ्यांना १ ते ७ एप्रिल या कालावधीत एका आठवड्याची स्पेशल सुट्टी जाहीर केली आहे. फॅन मेई एज्युकेशन ग्रुप अंतर्गत नऊ कॉलेजेसपैकी, मियायांग फ्लाइंग व्होकेशनल कॉलेज हे २१ मार्च रोजी स्प्रिंग ब्रेक जाहीर करणारे पहिले कॉलेज होते. यामध्ये रोमान्सवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उर्वरित कॉलेजेसनेही सुट्टी जाहीर केली आहे.

एका निवेदनात मियायांग फ्लाइंग व्होकेशनल कॉलेजचे डेप्युटी डीन म्हणाले की, या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी निसर्गातील हिरवे पर्वत, वाहते पाणी पाहण्यासाठी जातील अशी अपेक्षा आहे. जेणेकरून त्यांना वसंत ऋतूचा अनुभव घेता येईल. यामुळे विद्यार्थ्यांच्या भावना विकसित होण्यास मदत होईलच, शिवाय त्यांच्यात निसर्गाविषयी प्रेमही निर्माण होईल. यामुळे जेव्हा ते पुन्हा क्लासरुममध्ये येतील तेव्हा त्यांची शैक्षणिक क्षमता समृद्ध आणि सखोल झालेली असेल.

घटत्या जन्मदरामुळे चीन त्रस्त

खरं तर, चीन घटत्या जन्मदरामुळे खूप चिंतेत आहे. यामुळे तेथील सरकारच्या राजकीय सल्लागारांनीही जन्मदर वाढवण्याच्या शिफारशी केल्या आहेत. चीनमध्ये जन्मदर वाढवण्यासाठी अनेक योजना यापूर्वीच सुरू करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये नवविवाहित जोडप्याला एक महिन्याची पगारी सु्ट्ट्या देण्याचे नियम आहेत. यानंतर आता कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेम आणि रोमान्स करण्यासाठी सुट्टी दिली आहे. या सुट्ट्या देखील चीनच्या नवीन पॉलिसीचा एक भाग आहे.

सुट्ट्यांसह दिला एक हटके होमवर्क

कॉजेलमधील विद्यार्थ्यांना सुट्ट्यांसह एक जरा हटके होमवर्कही देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना या सुट्टीच्या काळात घालवलेला वेळ आणि कामाचा अनुभव त्यांनी डायरीत लिहिण्याच्या सूचना करण्यात आला आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित करून त्यांच्या प्रवासाचे व्हिडिओ बनवण्यास सांगितले आहे.