China Gold ATM Viral Video : भारतात सध्या सोन्याच्या दरांत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. वाढत्या किमतींबरोबर सोन्याच्या खरेदी -विक्रीतही वाढ होताना दिसतेय, सोन्याच्या वाढत्या किमती लक्षात घेता, अनेक जण गरजेसाठी आपल्याकडील सोने विकतात. पण, सोन्याची कोणतीही वस्तू सोनाराकडे विकताना आपल्याला आधी अधिकृत बिल आहे का, अशी विचारणा केली जाते. पण, अनेकदा आपल्याकडे जुने बिल नसते. अशा वेळी काय करायचे ते सुचत नाही. पण, आता कोणतीही सोन्याची वस्तू तुम्हाला बिलाशिवाय विकणे सोपे होणार आहे. हो, कारण बाजारात आता चक्क सोने विक्रीसाठी एक अनोखी एटीएम मशीन आली आहे. त्यात तुम्हाला सोन्याची वस्तू ठेवताच योग्य पैसे मिळणार आहेत. या सोन्याच्या एटीएम मशीनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. पण, ही मशीन नेमकी कशी काम करते ते जाणून घेऊ…

चीनच्या सर्वांत मोठे शहर असलेल्या शांघायमधील एका बड्या शॉपिंग मॉलमध्ये ही सोन्याची एटीएम मशीन बसवली आहे. ही अनोखी एटीएम मशीन आता लोकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

सोन्याची एटीएम मशीन कशी काम करते?

या एटीएम मशीनमध्ये सोन्याची वस्तू ठेवताच त्याचे वजन केले जाते. त्यानंतर ती वस्तू १२०० अंश सेल्सिअस तापमानावर वितळवली जाते. नंतर शुद्धता तपासून त्याची थेट किंमत दर्शवली जाते. त्यानंतर सध्याच्या दरानुसार एटीएममधून त्या वस्तूचे पैसे बाहेर येतात. तुम्हाला कॅश नको असल्यास तुम्ही हे पैसे थेट बँकेतदेखील ट्रान्स्फर करू शकता. त्यामुळे या मशीनला आता ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

या एटीएम मशीनमध्ये तीन ग्रॅमपेक्षा जास्त वजन असलेल्या आणि किमान ५० टक्के शुद्ध असलेल्या सोन्याच्या वस्तू आणि दागिनेच विकता येतात. दरम्यान, मशीनमध्ये सोन्याची वस्तू विकण्याची प्रक्रिया पूर्ण करीत पैसे मिळण्यासाठी जवळपास २० मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे लोकांना आता या एटीएम मशीनमधून सोन्याची विक्री करणे खूप सोपे वाटत आहे. अनेक जण वारसा हक्काने मिळालेले सोन्याचे दागिने एटीएममध्ये विक्रीसाठी घेऊन येत आहेत.

सर्वप्रथम ही मशीन सोन्याच्या वस्तूचे वजन करते. त्यानंतर ती वस्तू ९१.९९ टक्के शुद्ध आहे की नाही ते तपासते. मग चालू भावानुसार वस्तूची किंमत ठरवते आणि सेवा शुल्क वजा करून तुम्हाला पैसे दिले जातात.

मीडिया रिपोर्टनुसार, चीनच्या शेन्झेन येथील किंगहूड ग्रुप कंपनीने ही अनोखी सोन्याची एटीएम मशीन बनवली आहे. चीनमधील १०० हून अधिक शहरांमध्ये ही मशीन बसवण्यात आली आहे. इतकेच नाही, तर शांघायमध्ये लोकांची मिळणारी पसंती पाहता, आणखी एक सोन्याचे एटीएम मशीन आता बसविले जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता तेथे कोणत्याही बिल, कागदपत्रांशिवाय सहजपणे आपल्याकडील सोने विकता येईल.