सोशल मिडियावर दोन बड्या ब्रॅण्ड्समध्ये होणारी शाब्दिक चकमक आता नेटकऱ्यांसाठी नवीन राहिलेली नाही. सामान्यपणे एकमेकांवर कुरघोडी करताना हे ब्रॅण्ड्स प्रतिस्पर्धी कंपनीला चांगलेच ट्रोल करतात. असेच काहीसा प्रकार नवीन वर्षाच्या सुरूवातीला चीनमध्ये घडला आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यामुळे चीनमधील कंपनीने दोन कर्मचाऱ्यांना दंड ठोठावला आहे. कारण, त्या दोघांनी आयफोनवरून हे ट्वीट केलं होतं.

चीनमधील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दोन कर्मचाऱ्यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पण, शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी आयफोनचा वापर केला. आयफोन निर्माण करणारी अॅपल ही हवाई कंपनीची सर्वात तगडी प्रतिस्पर्धी कंपनी आहे.

ट्विटरच्या अधिकृत हँडलवर हे ट्वीट आयफोनद्वारे केल्याचं दिसून आलं. काही तासांनी ही गोष्ट लक्षात आल्यावर हवाईने ते ट्वीट डिलीट केलं. मात्र, तोवर अनेकांनी ते ट्वीट रिट्वीट केलं होतं आणि त्यावर प्रतिक्रियाही नोंदवल्या होत्या. या प्रकारानंतर कंपनीच्या वरिष्ठांनी या दोन कर्मचाऱ्यांना दंड ठोठावला. आता त्यांच्या या महिन्याच्या पगारातून तब्बल ७३० डॉलर कापून घेतले जाणार आहेत.

Story img Loader