जगभरात महिला सुरक्षेचा प्रश्न विविध घटनांमुळे सातत्याने उपस्थित होत आहे. कारण दररोज महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असतात. यात खूप कमी महिला आहेत, ज्या आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचे धाडस दाखवतात. ज्यामुळे त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला वेळीच शिक्षा होते. अशाच प्रकारे मलेशियात एका परदेशी तरुणीसोबत गैरवर्तनाची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्याविरोधात तिने आवाज उठवत आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मलेशियाच्या समुद्रात चीनमधील २४ वर्षीय तरुणी पर्यटनासाठी गेली होती. या वेळी समुद्रात स्कूबा डायव्हिंग करताना तिच्यासोबत असलेल्या ट्रेनरने जबरदस्तीने तिच्या गालाचे चुंबन घेतले. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यानंतर पोलिसांनी ट्रेनरला अटक केली आहे.
मलेशिया हे जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असल्यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक मलेशियामध्ये पर्यटनासाठी जातात. या देशाची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. अथांग समुद्रकिनारा लाभलेल्या या पर्यटनस्थळी अनेक पर्यटक स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेतात. अशाच प्रकारे चीनमधील एक तरुणी ५ मे रोजी स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेण्यासाठी आली होती. या वेळी एका ट्रेनरच्या मदतीने ती स्कूबा डायव्हिंग करीत होती. हे ट्रेनर स्कूबा डायव्हिंग करताना पर्यटकांचे फोटो क्लिक करण्यासह पर्यटकांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतात. मात्र या तरुणीसोबत गेलेल्या ट्रेनरने समुद्रात स्कूबा डायव्हिंग करताना संधी साधून तरुणीच्या गालाचे जबरदस्तीने चुंबन घेतले.
हेही वाचा : बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी खरेदी केला संपूर्ण परिसर
महिलेने आरोप केला आहे की, या स्कूबा एक्सपर्टने समुद्रात स्कूबा डायव्हिंग करताना तिचे जबरदस्तीने चुंबन घेतले. यानंतर समुद्रातून बाहेर येताच तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने तिच्या मोबाइलवर अनेक मेसेज पाठवले. ती कुठे राहते, कुठे जाणार याची विचारणा केली, इतकेच नाही तर त्याने तिला पूर्ण वैयक्तिक माहिती विचारत तिच्यासोबत एकांतात वेळ घालण्याबद्दलही विचारले. ट्रेनरच्या या कृत्यामुळे पीडित तरुणी खूप घाबरली आणि तिने पोलीस ठाणे गाठून ट्रेनरविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर विनयभंगाच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपीला रविवारी रात्री १२.५० च्या सुमारास तेथील एका गावातून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू आहे. पण पर्यटकासोबतच्या अशा प्रकारच्या गैरवर्तणुकीवर आता जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे.