प्रेयसीसाठी एखादी भेट देणे म्हणजे प्रियकरासाठी दुसरी डोकेदुखीच. तिला काय आवडेल काय नाही याचा विचार करायचा आणि तसंच गिफ्ट घ्यायंच. त्यातून प्रेयसी नकटी असली तर तिला ते आवडेल की नाही असे एक ना दोन १०० विचार त्याच्या डोक्यात असतात. आपण जे काही गिफ्ट देऊ त्याने तिला एकदम भारीच वाटलं पाहिजे असं सारखं त्याला वाटत असतं. म्हणूनच असं हटके गिफ्ट शोधण्यासाठी जग पालथं घालावे लागले तरी चालेल. आता याच प्रियकराचं घ्या ना आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी त्याने चक्क नोटांपासून गुच्छ बनवून घेतला.
वाचा : दोन हजाराच्या नोटांनी सजवलेल्या गाडीमागचे व्हायरल सत्य उघड
या गुच्छासाठी थोडेथोडके नाही तर तब्बल १ लाखांच्या आसपास पैसे त्याने खर्च केले. चीनमधल्या एका प्रियकराने हा प्रताप केला आहे. डेली मेल युकेच्या माहितीनुसार इथल्या स्थानिक दुकानदाराकडून त्याने हा गुच्छ बनवून घेतला आहे. खास फुलांच्या आकारात त्याने या नोटांची रचना करून घेतली. आता पैशांच्या गुच्छाएवढी चांगली भेट त्याच्या प्रेयसीसाठी असूच शकत नाही. त्यामुळे या नोटांच्या गुच्छाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आपल्या प्रेयसीसाठी हटके गुच्छा देणारा हा काही पहिलाच प्रियकर नाही म्हणा. मलिना येथे राहणा-या रॅकोने आपली प्रेयसी अॅनिकाला फुलांचा नाही तर चक्क चिकन नगेट्सचा गुच्छ देऊन खूष केले होते. असा गुच्छ याआधी नक्कीच कोणाला मिळाला नसेल. त्यामुळे हटके अंदाजात आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करणा-या या प्रियकराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अॅनिकाने आपल्याला फुलं अजिबात आवडत नाही असे रॅकोला सांगितले होते. फूल आणि चॉकेलटमध्ये फारशी रस न घेणारी अॅनिका इतर मुलींपेक्षा थोडी हटके आहे हे रॅकोच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने मॅक डोनोल्डच्या आऊटलेट्समधून तिच्यासाठी चिकन नगेट्सचा गुच्छ बनवून घेतला होता. या जोडप्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.