प्रेमात अपयश पदरात पडलेला प्रेमवीर कोणत्याही थराला जात असल्याच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात. असंच काहीसं चीनमध्ये पाहायला मिळालं. प्रेमात अपयशी ठरलेल्या एका अभियंत्याने चक्क रोबोटशी लग्न केलं. वधूशोध मोहिमेतील अपयशाने चीनमधील या अभियंत्याने रोबोटशी लग्न करण्याचा निश्चय केला. ३१ वर्षांचा झेंग जीयजीय आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स एक्स्पर्ट असून, चीनमधील झेजियांग प्रांतात राहतो. रोबोट तयार करणे आणि डिझाइन करण्यात तो तरबेज आहे. गतवर्षी त्याने एका स्त्री रोबोटची निर्मिती केली होती. यिंगिंग नावाची ही रोबोट चायनीज अक्षर आणि फोटो ओळखू शकते. याशिवाय ती चिनी भाषेतील काही सोप्या शब्दांचे उच्चारणदेखील करते. झेंगने पारंपरिक चिनी पद्धतीने शुक्रवारी या रोबोटसोबत लग्न केल्याचं चिनी माध्यमांतील वृत्तात म्हटलं आहे. झेंगची आई आणि काही मित्र या लग्नसोहळ्यास उपस्थित होते.
लग्नसोहळ्यात महिला रोबोट यिंगिंगने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. डोक्यावर लाल रंगाचा स्कार्फ टाकून तिचे तोंड झाकण्यात आले होते. गर्लफ्रेण्ड मिळत नसल्याने हताश झालेल्या झिंगने रोबोटशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे त्याच्या एका मित्राने सांगितले. आपल्या रोबोट पत्नीला चालता यावे आणि घरातील कामात तिने हातभार लावावा यासाठी झेंग तिला अपग्रेड करणार असल्याचेदेखील वृत्त आहे. हुवाई कंपनीत काम केलेल्या झेंगने २०१४ मध्ये या कंपनीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्याने ड्रीम टाउन नावाच्या इंटरनेट व्हेंचरमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
झेंगने गतवर्षाच्या अखेरीस एका रोबोटची निर्मिती केली होती आणि आपले उर्वरित आयुष्य स्त्री रोबोटसोबत घालविण्याचे ठरविल्याची माहिती झेंगच्या एका मित्राने Qianjiang Evening News ला दिली. चिनी पारंपरिक पद्धतीने झेंग आणि रोबोटच्या लग्नाचे सर्व विधी पार पडले. रोबोटशी लग्न करण्याबाबतचे भविष्य याआधीसुद्धा वर्तविण्यात आले आहे. २०५० पर्यंत रोबोटचेदेखील लग्न व्हायला सुरुवात होईल, असे रोबोटिक्स एक्स्पर्टसचे मानणे आहे.