अनेकदा असं होतं की फळं किंवा भाज्या त्यांच्या मुळ रुपात नसतात. कधी कधी त्यांचा आकार नेहमीच्या आकारापेक्षा खूपच विचित्र होत जातो मग आपणच या आकारांचे वेगवेगळे अर्थ लावतो किंवा कधीकधी निसर्गाच्या चमत्कारानेही आपणही थक्क होतो. म्हणजे बघांना एखाद्या फळामध्ये कधी सोंडेचा आकार तयार होतो तर कधी माणसाचा चेहरा दिसतो. असे निर्सगाचे चमत्कार तुम्ही यापूर्वीही कधीना कधी पाहिले किंवा ऐकले असतीलच. पण चीनमधला हा निसर्गाचा चमत्कार खचितच तुम्ही पाहिला असेल. इथल्या एका माणसाला चक्क टॉमेटोच्या आतमध्ये स्ट्रॉबेरी मिळाली आता या चमत्काराने तोही काहीसा चक्रावून गेला आहे, याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असा चमत्कार घडला तरी कसा याचे उत्तर त्याला शोधायचे आहे.
वाचा : सोन्याचे अंडे देणारी नव्हे; तर हिरा देणारी कोंबडी
चोवीस वर्षांच्या वँग याने गेल्या आठवड्यात बाजारातून काही टॉमेटो खरेदी केले होते. यातला एक टॉमेटो खाताना त्याला हा टॉमेटो जरा वेगळा असल्याचे लक्षात आले. त्याने नीट पाहिले असता त्याला टॉमेटोच्या बियांच्या जागी लालचुटूक स्ट्रॉबेरी दिसली. साहजिकच या प्रकाराने तो पूर्णपणे चक्रावून गेला. विबो या सोशल मीडिया साईटवर त्याने हा फोटो शेअर केला आहे. निसर्गाच्या या चमत्काराने अनेकांना कोड्यात पाडले आहे. ही किमया झाली तरी कशी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण परागीभवनाच्या क्रियेतून कदाचीत असा चमत्कार झाला असेल असे अनेकांचे म्हणणं आहे. कारण काही असेना पण पोटात स्ट्रोबेरी असलेल्या ‘स्ट्रॉ-मेटो’ आपण तरी यापूर्वी पाहिला नसेल हे नक्की!