Woman Recording Video Falls from Moving Train: सेल्फी, रिलं बनवणं, व्लॉग करणं हे आता सामान्य झालं आहे. हातात मोबाइल आला की, त्यावरून व्हिडीओ बनविण्याची हौस अनेकजण पूर्ण करत असतात. काही जणांना व्हायरल होणारे व्हिडीओ बनवायचे असतात. त्यामुळे ते जोखीम उचलायला तयार होतात आणि स्वतःसह इतरांचेही आयुष्य धोक्यात घालतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक पर्यटक महिला ट्रेनच्या बाहेर डोकं काढून मोकळ्या हवेचा आनंद घेत आहे. समुद्रकिनारपट्टीच्या जवळून ही ट्रेन जात आहे. मात्र काही क्षणातच या महिलेचं डोकं एका झाडाला आपटतं आणि ती खाली पडते.
द सन या संकेतस्थळानं दिलेल्या बातमीनुसार, सदर घटना श्रीलंकेत घडली असून चीनमधील पर्यटक महिला सेल्फी घेण्याच्या नादात ट्रेनमधून पडली. सदर महिला ट्रेनच्या बाहेर लटकून व्हिडीओ काढत होती. यावेळी बाहेरील एका झाडाला धडक लागून महिला खाली पडते. ट्रेनच्या आतमधून महिलेचा सहकारी व्हिडीओ काढत होता. सदर पूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
डेली शेरलॉक या एक्स युजरने सदर व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, श्रीलंकेतील समुद्र किनारपट्टीलगत धावणाऱ्या ट्रेनमध्ये एक महिला व्हिडीओ काढण्यासाठी ट्रेनमधून बाहेर डोकं काढून उभी होती. मात्र ट्रेनबाहेरील झाडाला डोकं आपटल्यामुळे ती अचानक खाली पडली. हा थरारक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
द सनने दिलेल्या बातमीनुसार, पुढील स्थानकावर ट्रेन थांबल्यानंतर पर्यटक महिलेचे सहकारी ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे लगेच गेले. महिलेला झाडाची जोरदार धडक लागली होती. त्यामुळं सहकारी काळजीत होते. पण अपघातस्थळी पोहोचल्यानंतर त्यांना सुखद धक्का बसला. सुदैवाने महिलेला कोणतीही दुखापत झाली नव्हती. झाडाला टक्कर लागून पडल्यानंतर समुद्रकिनारी असलेल्या झुडुपात महिला अडकून पडली. त्यामुळे तिला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. स्थानिक पोलिसांनीही दिलेल्या माहितीनुसार महिलेला कोणतीही दुखापत झालेली नाही.
यानिमित्ताने पोलिसांनीही पर्यटकांना आपल्या जीविताची काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. दरम्यान सदर व्हिडीओ एक्सवर व्हायरल झाला असून अनेकजण महिलेवर टीका करत आहेत. पर्यटनाला गेल्यानंतर असले स्टंट करू नयेत, जेणेकरून आपल्याबरोबर आलेले लोकही अडचणीत येतात. तर काही जणांनी हा मूर्खपणा असल्याचे म्हटले.