”१ वाजलाय, लंच ब्रेक झालाय, चला जेवायला जाऊ”
” नाही, तुम्ही जा मला आज खूप काम आहे”
” कँटीनमध्ये कोण जाणार? किती गर्दी आहे तिथे”
”कँटीनमध्ये सगळं संपलंय ऑफिसच्या खालच्या गाड्याही बंद आहेत. काहीच खायला नाही”
”आता कँटीनमध्ये जाऊन जेवायला वेळ नाही डेक्सवरच खातो.”
लंच ब्रेक झाला की आपल्या सहका-यांच्या तोंडी ही ठरलेली वाक्य नेहमी ऐकायला मिळतात. आजकाल कामाचा एवढा पसारा वाढलाय की वेळेत जेवायला कुठे मिळते? आणि काम संपवून जेवायला जायचं झालंच तर एकतर भूक तरी मेलेली असते किंवा कँटीनमधलं जेवण तरी संपलेलं असतं. असं अनेकांच्या बाबतीत होतं. आपल्याकडे तर काही वर्कोहॉलिक लोक असेही असतात की जे घरी अजिबातच जात नाही, काम एके काम. त्यांचं जेवण सुद्धा त्या ऑफिसच्या डेक्सवर होतं, तिथेच डब्बा खायचा, शेजारी पडलेल्या टिश्यू पेपरला हात फुसायचे आणि पुन्हा किबोर्डची बटणं बोटांनी तुडवायची असा सारा प्रकर ऑफिसमध्ये सुरू असतो. तेव्हा पुढच्या वेळी ऑफिसमध्ये बॉसने ‘तुम्हाला काय हवंय का?’ असे विचारले की ही माणसं ‘डेक्सशेजारी एखादा इंडक्शन चुल्हा, टोप, भांडी वगैरे पुरवण्याची व्यवस्था करा’ असं सांगायलाही कमी करणार नाही’. बरं हा झाला गंमतीचा भाग.

अनेकांना ऑफिसमधल्या कामामुळे जेवायलाही वेळ मिळत नाही, अशांसाठी सोशल मीडियावर एक विनोदी व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. ऑफिसमधल्या वस्तू वापरून झडपट डेक्सवर जेवण कसे बनवाल असा हा व्हिडिओ आहे. अर्थात आपल्या इथे असं कोणी करणार नाही, ना एचआर करू देणार पण मज्जा किंवा निव्वळ मनोरंजन म्हणून एकदा हा व्हिडिओ पाहायला काहीच हरकत नाही. चीनी सोशल मीडिया व्हिबोवर हे व्हिडिओ लोकप्रिय होत आहे. ऑफिसमधल्या छोट्या मोठ्या वस्तू वापरून झटपट पाककृती बनवायला एक तरुणी शिकवत आहे. आता ऑफिसमध्ये बसून नक्की ती काय शिजवते हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागणार.

Story img Loader