तब्बल २१ यशस्वी सुपरहिरोपटानंतर या सिरीजमधला ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ हा सिनेमा अखेर आज जगभरामध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाआधीच जगभरातील बॉक्सऑफीसवर अनेक विक्रम या सिनेमाने मोडले आहेत. या सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये इतकी उत्सुक्ता आहे की अनेकजण हजारो रुपयांची तिकीटे काढून हा सिनेमा पाहत आहेत. सिनेमाच्या तिकीटांची मागणीही इतकी आहे की अनेक ठिकाणी सलग ७२ तास सिनेमागृहे सुरु ठेवण्यात येणार आहेत. या सिनेमाच्या तिकीटासाठी आणि प्रदर्शनाआधीच केलेल्या कामाईची आकडेवारी तसेच चहात्यांसंदर्भातील जगभरातून येणाऱ्या बातम्या थक्क करणाऱ्या आहेत. अशीच एक बातमी चीनमधून समोर आली आहे. येथील एक तरुणी हा सिनेमा पाहताना इतकी भावूक झाली आणि इतकी रडली की तिला चक्क रुग्णालयात दाखल करावे लागले.
‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’च्या सिरीजमधील शेवटचा सिनेमा असणारा ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ या सिनेमा काल रात्री चीनमध्ये पहिला शो झाला. हा शो पाहण्यासाठी आलेली निंगबो शहरातील एक २१ वर्षीय तरुणी सिनेमा पाहून इतकी रडली की तिला छातीत दुखू लागले आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तिची अस्वस्थता पाहून लगेच रुग्णावाहिकेतून तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करेपर्यंत तिच्या हातापायांना आकडी आल्याने तिचे स्नायूही आखडले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सर्वात आधी तिला ऑक्सिजन मास्क लावण्यात आला. या मुलीला डॉक्टरांनी शांत होण्याचा सल्ला दिला, जोपर्यंत तू शांत होत नाही तोपर्यंत काहीच करता येणार नाही असं सांगितल्यानंतर ती थोडी शांत झाली आणि त्यानंतरच डॉक्टरांनी पुढील उपचार केल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितले आहे. या मुलीवर उपचार करुन तिला घरी सोडण्यात आल्याचेही स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितले आहे.
‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ सिनेमाची पाश्चिमात्य देशांबरोबर चीनमध्येही चांगलीच चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून चीनमधील सर्वात लोकप्रिय वेबसाईट असणाऱ्या ‘विबो’वर सर्च करण्यात आलेल्या सर्चपैकी ५० टक्क्यांहून अधिक सर्च हे या सिनेमासंदर्भातील होते. सिनेमा पाहताना रडू आल्याने रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या या मुलीची स्टोरी ‘विबो’वर चांगलीच चर्चेत आहे. अनेकांनी या मुलीला ‘लवकर ठीक हो’ अशा शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी सिनेमामध्ये इतकेही गुंतून जावू नये असा सल्ला या मुलीला दिला आहे.